Maharashtra

“शिवसेना सध्या खूप हवेत आहे. त्यांना वाटतंय की, स्वर्गाला बोटं टेकली आहेत.”- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

By PCB Author

July 28, 2020

कोल्हापूर,दि २८ (पीसीबी) : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं एक वक्तव्य चर्चेचा विषय ठरतंय.  “प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत भाजपने स्वबळाचा नारा दिला असला तरी, राज्याच्या हितासाठी आजही आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत. एकत्र आलो तरी निवडणुका मात्र आम्ही वेगळ्याच लढणार.” असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे, भाजप शिवसेनेसोबत एकत्र येण्यास आजही तयार असल्याचं यावरून स्पष्टपणे दिसतंय.

“मी आम्हा सगळ्यांचं सामूहिक मानस व्यक्त करत आहे. राज्याच्या हितासाठी केंद्राने जो फॉर्म्युला तयार केला आहे. मुळात तो शिवसेनेला मान्य झाला. पण, शिवसेना सध्या खूप हवेत आहे. त्यांना वाटतंय की, स्वर्गाला बोटं टेकली आहेत. ते ऐकतील असं नाही. एकत्र निवडणूक लढवायच्या, मोदींच्या व्होटबँक, त्यांनी केलेल्या कामाचा फायदा घ्यायचा. मग तुम्ही विरोधी पक्षात राहिला असतात तर चाललं असतं. ज्यांच्याविरोधात लढलात, त्यांच्यासोबतच सरकार स्थापन केलं.”असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

“जेव्हा विधानसभा निवडणूक झाल्या त्यानंतर सत्तास्थापनेच्या वेळीही आम्ही एकत्र यायला तयार होतो. पण, भाजपचे 105 आणि शिवसेनेचे 56 अशा परिस्थितीत मुख्यमंत्रीपद मागतातच कसे? राज्याच्या हिताचा विचार त्यांनीही केला पाहिजे. हितासाठी अवाजवी मागू नये, वाजवी मागावं,” असा खोचक टोमणाही चंद्रकांत पाटलांनी मारला.

“चौथीतल्या मुलाला निबंध लिहायला सांगितला तरी तो लिहिल की, सध्याचं सरकार राज्याचं हित पाहत नाहीये. त्यांच्यात समन्वय नाही. दररोज वेगवेगळे निर्णय घेतले जातात. हे सगळं पाहिल्यानंतर सरकार नीट चाललंय की नाही? यावर चौथीतला मुलगा किंवा मुलगी सुद्धा निबंध लिहिल,” असंही पाटील म्हणाले.