Maharashtra

शिवसेना सत्तेसाठी लाचार नाही, आम्ही आमचा बाणा जपला!

By PCB Author

February 20, 2019

मुंबई, दि. २० (पीसीबी) – शिवसेना हे अडगळीतले भांडे कधीच नसल्याने सत्य, देशहित व हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर आमचे भांडे भांड्यास लागून वाजत राहिले व खणखणीत नाणे गाजत राहिले. दबाव आणि मुस्कटदाबी ही भुते आम्ही शिवसेनेच्या मानगुटीवर कधीच बसू दिली नाहीत. आम्ही आमचा बाणा जपला, जपत राहू. शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली नाही, अशा शब्दांत शिवसेनेने युतीबाबतची भूमिका ‘सामना’च्या अग्रलेखातून स्पष्ट केले आहे.

आगामी  लोकसभा आणि विधानसभेसाठी शिवसेना-भाजप युतीची घोषणा  झाली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुंबईत सोमवारी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली. यानंतर शिवसेनेने आपली युतीबाबतची भूमिका स्पष्ट केली.

आमच्या पाठीत वार झाले व ते स्वकीयांनीच केले. इतिहासात हे वारंवार घडले. मग ते शिवराय असतील नाहीतर शिवसेनाप्रमुख. पाठीवरचे वार सहन करून व प्रसंगी सांडलेल्या रक्ताची किंमत मोजून त्यांनी संघटन पुढे नेले. ही माघारही नसते व लाचारीदेखील नसते, तडजोड तर नाहीच नाही. देशातील वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत ते उद्याच कळेल, पण ‘वारे’ आमच्या बाजूला वळले. वारा येईल तशी आम्ही पाठ फिरवली नाही याची नोंद इतिहासाला घ्यावीच लागेल. तूर्त इतकेच पुरे! तलवारीची धार कायम आहे व शिवसेनेची तलवार ‘म्यानबंद’ नाही, असे ‘सामना’त म्हटले आहे.