Maharashtra

शिवसेना युतीसाठी राजी; मात्र, भाजपसमोर ठेवल्या ‘या’ अटी

By PCB Author

December 19, 2018

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – युतीसाठी भाजपला झुंजवत ठेवणारी शिवसेना अखेर युती करण्यासाठी राजी झाली आहे. मात्र शिवसेनेने भाजपसमोर काही अटी ठेवल्या आहेत. लोकसभेसोबतच विधानसभा निवडणूक घ्यावी आणि युती करायची असेल, तर सन्मानजनक जागा वाटप करण्यात यावे, अशा दोन मागण्या शिवसेनेने भाजपसमोर ठेवल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.   

विधानसभेच्या १५५ जागा दिल्या तरच युती होईल, असा निरोप शिवसेनेने भाजपला दिल्याचे समजते.  या मागण्या पूर्ण झाल्या तरच शिवसेना भाजपसोबत युती करेल, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. आता  यावर भाजपकडून  कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तर शिवसेनेच्या या मागण्यांवर तडजोड करण्यासंदर्भात भाजपकडून चर्चा केली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

सध्या भाजपकडे १२१ तर शिवसेनेकडे ६३ आमदार आहेत. दोघांचेही विद्यमान आमदार १८४ आहेत. ते वगळता १०४ जागा शिल्लक राहतात. त्यापैकी ८५ जागा शिवसेना भाजपकडे मागत आहे. परंतु त्यांची बेरीज १४८ पर्यंत जाते.  या जागा भाजप शिवसेनेला देऊ शकत नाही. मात्र, ७५ जागा शिवसेनेला देण्यासाठी भाजप तयार आहे. त्यामुळे १३८ जागांवर शिवसेना युतीसाठी तयार होण्याची शक्यता आहे. म्हणजेच भाजपच्या वाट्याला १५० जागा येतील.