Maharashtra

शिवसेना युतीत सडली आणि १२४ वर अडली – राज ठाकरे

By PCB Author

October 11, 2019

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – शिवसेना युतीत सडली आणि १२४ जागांवर अडली असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला टोला लगावला. शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुखांनी आरोळी ठोकली होती की आम्ही राजीनामा देऊ, आमची एवढी वर्षं सत्तेत सडली त्यांचीच युती आता १२४ जागांवर अडली. हया असल्या लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका. सरकारला वठणीवर आणायचे असेल तर सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे असे म्हणत राज ठाकरे यांनी गोरेगावाच्या सभेत शिवसेना आणि भाजपावर कडाडून टीका केली.

आपल्या भाषणात त्यांनी बुलेट ट्रेनचाही मुद्दा आणला. जपानकडून कर्ज घेऊन १ लाख १० कोटींचा बुलेट ट्रेन प्रकल्प कोणासाठी उभारत आहात? काकोडकर समितीच्या अहवालानुसार देशातील रेल्वेचे जाळे सुधारायचे असेल तर १ लाख कोटींची गरज आहे, त्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत आणि बुलेट ट्रेनसाठी पैसे आहेत? कुणाच्या उपयोगालाही ही बुलेट ट्रेन येणार आहे असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. एवढेच नाही तर या बुलेट ट्रेनसाठी आदिवासींच्या जमिनी घेतल्या जात आहेत. या बुलेट ट्रेनचा उपयोग कुणाला आहे? संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची जखम पुन्हा जिवंत करण्याचा हा प्रयत्न आहे का? असाही प्रश्न राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणातून उपस्थित केला.

एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून मनसेला निवडून द्या अशी मागणी राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणातून केली. सत्ताधारी जर मनमानी करत असतील तर त्यांना जाब विचारण्यासाठी सक्षम आणि प्रबळ विरोधी पक्ष हवाच. ती भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगल्या पद्धतीने पार पाडेल असा विश्वास व्यक्त करुन राज ठाकरे यांनी सक्षम विरोधी पक्ष म्हणून मनसेला निवडा असे आवाहन उपस्थितांना केले.  शिवसेनेतील इनकमिंगवरही त्यांनी टीका केली. बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेनेत कधीही नेते आयात करावे लागले नाहीत असा टोला त्यांनी लगावला.