शिवसेना-भाजप युतीत आरपीआयला विधानसभेला जागा मिळणे कठीण; अस्तित्व टिकवण्याचे आव्हान  

0
536

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभा निवडणुकीत आघाडी करून राज्यात सत्ताधारी भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर तगडे आव्हान उभे केले. तर युतीतील घटक पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला युतीत एकही जागा न सोडल्याने त्यांचा पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणुकीत रिंगणात नव्हता. यामुळे अल्पसंख्याक, दलित, मुस्लिम मते स्वाभाविकपणे वंचित आघाडीकडे वळली. आता याचा मोठा फटका आरपीआयला येत्या विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर युतीत आरपीआयला जागा मिळवताना झगडावे लागणार आहे.   

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोला आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातून  निवडणूक लढवली होती. त्यांच्या उमेदवारीमुळे भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांच्या तोंडाला चांगलाच फेस आणला होता. त्याचबरोबर राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघात वंचित आघाडीचे उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे प्रस्थापित उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली . याचा काही प्रमाणात फटका काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बसू शकतो. पुणे जिल्ह्यातील चारही जागांवर वंचित आघाडीचे उमेदवार उभे होते. निवडणुकीत या उमेदवारांना दखल घ्यावी, असा प्रतिसाद मिळाला होता.

दरम्यान, सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी इतर  कोणत्याही राजकीय पक्षाबरोबर समझोता करणार नाही.  वंचित आघाडी सर्वच्या सर्वच २८८ जागा  स्वतंत्रपणे लढविणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. आम्हाला कोणत्याही पक्षाबरोबर आघाडी करण्याची गरज भासणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. लोकसभेच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीची ताकद संपूर्ण महाराष्ट्राला दिसेल, असाही दावा आंबेडकर  यांनी केला.

लोकसभेच्या जागा लढवित असतानाच आम्ही आगामी विधानसभेच्याही सर्व २८८ जागा स्वतंत्रपणे लढविण्याचा निर्णय घेतला  आहे, असेही आंबेडकर यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे भाजप-शिवसेना यांची युती होताना विधानसभेच्या प्रत्येकी १४४ जागा लढविण्यावर एकमत झाले आहे. त्यातच भाजप आरपीआयला आपल्या कोट्यातून किती जागा सोडणार हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. २०१४ च्या निवडणुकीत आरपीआयला एक जागा जिंकता आलेली नाही. तर आरपीआयचे सर्वेसर्वा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा प्रभाव ओसरू लागला आहे. आठवले यांनी लोकसभेची जागा सोडण्याची मागणी भाजपकडे केली होती. मात्र,  भाजपने त्यांना फाट्यावर बसवले होते.

आठवले सत्ताधारी भाजपसोबत असूनही आरपीआयच्या कार्यकर्त्यांमध्ये सत्तेचा वाटा देताना डावलल्याची भावना तीव्र झाली आहे. भाजप पुन्हा सत्तेत येण्यासाठी कोणतीही कसर सोडण्यास तयार नाही. त्यामुळे आरपीआयला जागा सोडताना भाजप नक्कीच विचार करेल. राज्यातील राजकारणात प्रकाश आंबेडकर यांनी स्पेस मिळविण्यात यश मिळवले आहे. याचा मोठा फटका आरपीआय बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. वंचित आघाडीने राज्यात हात–पाय पसरल्यास आरपीआयसमोर मोठे आव्हान असेल. या पार्श्वभूमीवर भाजप आरपीआयला किती जागा सोडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.