Maharashtra

शिवसेना-भाजप युतीची सोमवारी मुंबईत बैठक

By PCB Author

June 23, 2019

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोणाचा यावरून भाजप आणि शिवसेनेत दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. तर, दुसरीकडे निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी  शिवसेना-भाजप युतीची  सोमवारी (दि.२४) मुंबईत बैठक बोलावली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. ‘अब की बार २२०’ पार, फिर एक बार शिवशाही सरकार अशी घोषणाच भाजपने दिली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेने २२० जागांचे लक्ष्य ठेवले आहे. निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री राज्यात यात्रा काढणार आहेत.  सरकारने केलेल्या विकासकामांचा आढावा जनतेसमोर ठेवणार आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचे ठरले आहे, असे सांगितले असले तरी भाजप शिवसेनेत मोठा भाऊ आणि छोटा भाऊ कोण यावरून दावे प्रतिवादे सुरू झाले आहेत.  भाजपच्या अनेक नेत्यांनी भाजपचाच मुख्यमंत्री असेल, असे सांगण्यास सुरूवात केली आहे.  त्यामुळे या बैठकीत कोणती चर्चा केली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.