शिवसेना- भाजपाला स्पष्ट बहुमत, त्यांनीच सरकार स्थापन करावे; शरद पवारांचा सल्ला

0
460

मुंबई, दि. ८ (पीसीबी)-  राज्यातील जनतेने भाजपा-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत दिले असून समंजसपणा दाखवून त्यांनी सरकार स्थापन करावे असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले होते. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना शरद पवारांनी यांनी पुन्हा एकदा आपण विरोधी पक्षातच बसणार असल्याचे सांगितले.

यावेळी शरद पवारांनी बोलताना सांगितले की, “महाराष्ट्रात जी परिस्थीती निर्माण झाली आहे ती दुरुस्त होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रासारख्या इतक्या मोठ्या राज्यात सरकारच नाही असे होऊ नये”. रामदास आठवले यांनी भेटीत या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी काय सल्ला देऊ शकाल असी भूमिका मांडली असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

“भाजपा, शिवसेना आणि त्यांच्या मित्रपक्षांना जनतेने स्पष्ट बहुमत दिले आहे. त्यांनी सरकार स्थापन करत महाराष्ट्रात स्थिरता येईल याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी रामदास आठवले यांनी अधिक प्रयत्न करावे असा सल्ला मी दिला आहे. रामदास आठवले यांचे राजकीय पक्षांमध्ये वेगळे स्थान आहे. त्यांनी काही म्हणणे मांडले तर इतर पक्ष गांभीर्याने दखल घेत असतात,” असे शरद पवार यांनी सांगितले आहे.

कर्नाटकसारखी परिस्थिती निर्माण होईल की नाही हे सांगू शकत नाही. पण समंजसपणा दाखवून सरकार स्थापन करावे असे शरद पवार यांनी सांगितले आहे. तसेच आम्ही फक्त सल्ला देऊ, कोणतीही मध्यस्थी करणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना त्यांनी राज्यपालांनी बहुमत असणाऱ्या पक्षाला बोलवायला हवे होते. राज्यपाल भाजपाला का बोलवत नाही हे माहित नाही असेही म्हटले.