Maharashtra

शिवसेना भाजपसोबत युती करण्यास तयार, पण विधानसभेचे जागावाटप आताच करण्याची मागणी

By PCB Author

January 18, 2019

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या युतीचा सस्पेन्स कायम असल्याने दोन्ही पक्षांच्या आमदार-खासदारांच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी युती करायची असेल तर विधानसभेचेही जागावाटप आताच करून मुख्यमंत्रीपद अडीच वर्षांसाठी वाटून घेण्याचा शिवसेनेचा फॉर्म्युला असल्याची चर्चा आहे. मात्र त्या संदर्भात कोणतीही हालचाल झाली नसल्याने युतीची चर्चा आणि सस्पेन्स कायम आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत युतीमुळे भाजपचे २२ तर शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते. त्यानंतर विधानसभेसाठी युती तुटल्यावर मोदी लाट कायम असताना शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काहीही नुकसान होणार नाही, असा शिवसेनेला विश्वास आहे. शिवसेनेला दिल्लीच्या सत्तेत रस नसल्याने युतीशिवाय लोकसभा निवडणुकीत आपले किंती नुकसान होणार यापेक्षा भाजपच्या पाडावात सेना नेत्यांना रस असल्याची चर्चा आहे.

शिवसेनेने युती केली नाही तरी ठाकरे शब्दावर ठाम असल्याच्या संकेतामुळे आणि स्वतःच्या ताकदीवर सेनेचे दहा ते बारा खासदार निवडून येवू शकतात, यात मुंबईतील तीन, ठाण्यातील दोन, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, जालना, औरंगाबाद, परभणी आणि शिरूर लोकसभा जिंकण्याचा विश्वास सेना नेत्यांना आहे. याउलट भाजपची संख्या २२ वरून एक आकडी होण्याचा आनंद अनुभवता येईल, असे शिवसेनेचे नेते उघडपणे सांगत आहेत.