Maharashtra

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार पाच वर्ष टिकणार- शरद पवार

By PCB Author

November 15, 2019

 मुंबई, दि.१५ (पीसीबी)- राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याचं सांगत सकारात्मक संकेत दिले आहेत. तसंच शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार पाच वर्ष टिकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. शरद पवार यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, “सामायिक कार्यक्रम ठरवण्यावर आणि फॉर्म्युलावर सध्या चर्चा सुरू आहे. ठोस निर्णय झाल्यानंतर फॉर्म्युला सर्वांसमोर उघड केला जाईल”.

“ज्यांची मुख्यमंत्रिपदाची मागणी त्याच्यावर विचार झाला पाहिजे. स्थिर सरकार यावं ही आमची सर्वांची इच्छा आहे. राज्यात मध्यवर्ती निवडणुका होणार नाहीत. राज्यात स्थिर सरकारच स्थापन होईल, हे सरकार पाच वर्ष चालेल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू,” असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मी पुन्हा येणार असं म्हणत टोला लगावला. “मी फडणवीसांना गेल्या काही वर्षांपासून ओळखतो. पण ते ज्योतिषशास्त्राचे विद्यार्थी आहेत, हे मला आत्ताच कळलं,” असं ते म्हणाले. “राज्यातील जनतेने कोणालाही पूर्ण बहुमत दिलं असतं, तर आज चर्चा करण्याची वेळच आली नसती,” असंही यावेळी त्यांनी सांगितले.