शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार

0
386

मुंबई,दि.१६ (पीसीबी)- शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या २२ दिवसानंतर सत्ता स्थापनेचा पेच सुटणार का? हा प्रश्न यामुळे राजकीय वर्तुळात विचारला जातो आहे. मात्र हे तिन्ही पक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने राज्यपालांना भेटणार आहेत असे एका मराठी वृत्तवाहिनीने म्हटले आहे. त्यावेळी सत्तास्थापनेसंदर्भातही राज्यपालांशी चर्चा होऊ शकते अशी शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून २२ दिवसांचा कालावधी उलटला आहे. तरीही महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळालेला नाही. सुरुवातीचे १६ ते १८ दिवस हे भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र येतील असं वाटलं होतं. मात्र शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची अट ठेवली. जी भाजपाने अमान्य केली. त्यामुळे या दोन पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला. भाजपाला सत्तास्थापनेसाठी जेव्हा निमंत्रण देण्यात आले तेव्हा त्यांनी सत्ता स्थापन करता येणार नाही असे सांगितले. त्यानंतर शिवसेनेला मुदत देण्यात आली. त्या मुदतीत शिवसेनाही दावा सिद्ध करु शकली नाही. त्यानंतर राष्ट्रवादीला बोलवण्यात आलं. राष्ट्रवादीनेही मुदतवाढ मागितली. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रपतींना राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंबंधी शिफारस केली आणि त्यानंतर राष्ट्रपतींनी यासंदर्भातला निर्णय घेऊन राष्ट्रपती राजवट लागू केली.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरीही सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. आता आज शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार आहे. ओल्या दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्याला तातडीने मदत करण्याची मागणी राज्यपालांकडे केली जाणार आहे.