शिवसेना एनडीएच्या बैठकीला अनुपस्थित राहणार- संजय राऊत

438

मुंबई, दि.१६ (पीसीबी)- हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्या (रविवार) एनडीएची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेना जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्तास्थापनेवरू शिवसेना आणि भाजपामध्ये दरी वाढली आहे.

सोमवारपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीच्या घटकपक्षांची बैठक पार पडण्याची शक्यता आहे. परंतु या बैठकीला शिवसेना उपस्थित राहणार नसल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. दरम्यान, नुकतीच आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतले आहे. सर्वकाही ठिकठाक आहे, असंही ते म्हणाले. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील संबंध ताणले गेले असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या पुण्यतिथी आहे. त्यामुळे शिवसेनेचे सर्वच नेते उद्या मुंबईत हजर राहणार आहेत.

राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला आहे. तीन आठवड्यानंतरही राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा न सुटल्यानं अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. अशातच राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. सत्तास्थापनेसाठी तिव्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकांचं सत्र सध्या सुरू आहे. तसंच ही चर्चा सकारात्मक होत असल्याचंही तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यात नव्या आघाडीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे