शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणेंनी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठेंची भेट घेतली; उलटसुलट चर्चांना उधाण

0
863

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार जोरात सुरू असताना शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांची भेट घेतल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. बारणे हे पिंपळेनिलखमध्ये प्रचारासाठी गेले असता ही भेट झाल्याचे समजते. परंतु, ही भेट मावळ मतदारसंघातील राजकीय चित्र स्पष्ट करणारी असून, राष्ट्रवादीने आघाडी धर्म पाळण्यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हेच युतीचे उमेदवार आहेत. अजितदादांचे पुत्र पार्थ पवार हे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आहेत. या मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात २१ उमेदवार असले, तरी खरी लढत ही बारणे आणि पवार यांच्यातच होणार आहे. या दोघांपैकीच एकजण निवडून येईल, असे मतदारसंघातील चित्र आहे.

निवडणुकीसाठी युती आणि आघाडी झाली असली तरी युतीतील भाजपने आणि आघाडीतील काँग्रेसने सुरूवातीला प्रचारापासून दूर राहणेच पसंत केले. भाजपला शिवसेनेकडून श्रीरंग बारणे हे उमेदवार म्हणून नको होते, तर राष्ट्रवादी हा विश्वासघात करणारा पक्ष असल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अंतर राखून ठेवले होते. परंतु, नंतर भाजप-शिवसेनेत मनोमिलन झाले, तर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्याचे आश्वासन अजितदादांनी दिले. त्यामुळे शिवसेनेच्या प्रचारात भाजप, तर राष्ट्रवादीच्या प्रचारात काँग्रेस दिसू लागली.

अशा परिस्थितीत शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मावळ मतदारसंघाची राजकीय हवा कोणत्या दिशेने चालले आहे, हे सांगणारी ही भेट असल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादीने काँग्रेस पदाधिकाऱ्यांना अजूनही पूर्णपणे विश्वासात घेऊन प्रचार करत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे बारणे-साठे यांच्या भेटीनंतर तरी राष्ट्रवादीकडून आघाडी धर्म पाळण्यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.