शिवसेना आणि भाजपमध्ये २० ते २५ जागांची अदलाबदल होणार

0
562

मुंबई, दि. १० (पीसीबी) –  आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून  अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. या नेत्यांना युतीमध्ये मतदारसंघ मिळवून देण्यासाठी शिवसेना आणि भाजप २० ते २५ जागांची अदलाबदल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दोन्ही पक्षात झालेले इनकमिंग आणि मागील निवडणुकीत मिळालेल्या मतांची टक्केवारी या निकषांवर ही अदलाबदल  करण्यात येणार आहे.  मुंबईतील ४ ते ५ मतदारसंघांची  अदलाबदल   करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

२०१४ मध्ये वडाळा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर  कालिदास कोळंबकर निवडून आले होते. भाजपचा उमेदवार येथे फक्त  ७००  मतांनी दुसऱ्या क्रमांकावर होता.  युतीत ही जागा परंपरागतरित्या शिवसेना लढवत होती. परंतु विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यांच्या भाजप प्रवेशामुळे ही जागा भाजपला सुटण्याची शक्यता आहे.

तर सिल्लोडची जागा भाजपकडे असूनही काँग्रेसचे विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्या शिवसेना प्रवेशामुळे ही जागा आता शिवसेनेला सुटणार आहे.वडाळा आणि सिल्लोडच्या सूत्राप्रमाणे विद्या ठाकूर यांची गोरेगावची जागा, वैभव पिचड यांची अकोले, संदीप नाईक यांची ऐरोली,  राणा जगजितसिंह यांची उस्मानाबाद या जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे.