शिवसेनाही आगामी निवडणुकांमध्ये इतर पक्षांतील उमेदवारांना आयात करणार; उद्धव ठाकरेंची रणनिती

0
2254

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – आता शिवसेनेनेही आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनिती अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या मतदारसंघात शिवसेनेकडे भक्कम उमेदवार नसल्यास पक्षातील पदाधिकाऱ्यांची नाराजी डावलून इतर पक्षातील निवडून येणाऱ्या उमेदवाराला पक्षात घेण्याची रणनिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आखल्याचे समजते. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा पक्का इरादा करूनच ठाकरे यांनी ही रणनिती अवलंबण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे मतदारसंघातील आढावा घेत आहेत. या आढावा बैठकांमधून ते शिवसेनेच्या नेते व पदाधिकाऱ्यांना भाजपच्या तोडीस तोड रणनीती उभारण्याच्या सूचना देत आहेत. अनेक मतदारसंघांमध्ये शिवसेना उमेदवार थोडक्या मतांनी पडत असल्याच्या आकडेवारीवर या बैठकांमध्ये जोर दिला जात आहे. अशा अनेक मतदारसंघांमध्ये थोडक्या मतांनी निवडून येणाऱ्या अन्य पक्षांच्या उमेदवारांनी शिवसेनेतून निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न केलेले असतात, पण ‘तो पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता नाही’ या मुद्द्यावर भर देत त्याला उमेदवारी नाकारली जाते. मात्र, शिवसेनेच्या प्रत्येक निष्ठावान सैनिकाला न्याय द्यायचा असेल, तर राज्यात शिवसेनेची सत्ता असायला हवी. त्यासाठी शिवसेनेच्या आमदारांची संख्या वाढायला हवी, अशा शब्दांत उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना समजावत आहेत.

‘गेल्या निवडणुकीदरम्यान अन्य पक्षातील जवळपास २० ते २५ उमेदवार तिकिटासाठी माझ्याकडे आले होते. त्यांना केवळ पक्षातील उमेदवार नसल्याने आपण उमेदवारी नाकारली. मात्र तेच नंतर इतर पक्षातून निवडून आले, असे सांगत यावेळी निवडून येणाऱ्या उमेदवाराला शिवसेनेची उमेदवारी देण्याच्या स्पष्ट सूचना उद्धव यांनी मंगळवारी संपर्कप्रमुखांना दिल्याचे कळते.

उमेदवाराला तिकीट देताना प्रत्येक उमेदवार, संबंधित मतदारसंघाचे संपर्कप्रमुख तसेच इतर पदाधिकारी निवडून येण्याची शंभर टक्के खात्री देत असतात. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर पराभवाची कारणे देताना, समोरच्या उमेदवाराने पाच-पंचवीस कोटी रुपये खर्च केले, ईव्हीएम मशिनचा घोटाळा केला, अशा सबबी बहुसंख्य उमेदवार तसेच पदाधिकारी सांगतात. याबाबत उद्धव ठाकरे यांनी बैठकांमध्ये जोरदार कानउघाडणी सुरू केली आहे. ‘समोरचा उमेदवार करोडो रुपये खर्च करत असताना ते तुम्हाला कसे दिसत नाहीत? त्यांच्या तक्रारी तुम्ही का करीत नाहीत?’ अशा शब्दांत त्यांनी पदाधिकाऱ्यांकडे विचारणा केली.