शिवसेनाच सत्ता स्थापन करेल- मनोहर जोशी

0
400

मुंबई, दि. (पीसीबी) –  शिवेसेनेला दिलेली सत्तास्थापन करण्याच्या दाव्याची मुदत संपल्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले असताना राज्यात निर्माण झालेला सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटेल आणि शिवसेनाच सत्ता स्थापन करेल असा विश्वास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी व्यक्त केले आहे.

काल दिलेल्या मुदतीत शिवसेनेचे नेते राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी गेले असताना अपेक्षेनुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवेसेनेला पाठिंब्याचे पत्र न दिल्याने शिवसेनेचा सत्ता संपादनाचा दावा संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, आम्ही सत्ता संपादनाचा दावा करण्यासाठी पुन्हा येणार असल्याचे राज्यपालांच्या भेटीनंतर शिवसेनेचे युवानेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. या नंतर राज्यपालांनी तिसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेसाठी आमत्रित केल्यानंतर राज्यातील घडामोडींना आणखी वेग आला. त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेनेच्या मदतीने सरकार बनवणार का, या चर्चेला उधाण आले. दरम्यान, आज दुपारपर्यंतही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काहीही ठरले नसल्याने राज्यात नेमके काय होणार? राष्ट्रपती राजवट लागू होणार का, या दिशेने चर्चा सरकली. काँग्रेसच्या बाहेरून दिलेल्या पाठिंब्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापन करेल का, किंवा तिन्ही पक्ष मिळून सत्ता स्थापन करतील का, तसेच काँग्रेस आघाडीला शिवसेना बाहेरून पाठिंबा देईल या शक्यतांवर चर्चा रंगली.