शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची ‘ती’ एक इच्छा लवकरात लवकर सरकारने पूर्ण करावी

0
353

पुणे, दि.१५ (पीसीबी) : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पहाटे पुण्यात निधन झालं. त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना राज्यासह देशभरातल्या अनेक नेत्यांनी व्यक्त केली आहे. साताऱ्याचे माजी खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही आज बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवाचं दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी पुरंदरेंबद्दलच्या भावना व्यक्त करत त्यांनी एक इच्छा पूर्ण करण्याची मागणीही सरकारकडे केली आहे.

उदयनराजेंनी आज पुण्यात बाबासाहेबांच्या पर्वती इथल्या घरी येऊन त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. उदयनराजे म्हणाले, “ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, आमच्या कुटुंबातले एक घटक आदरणीय सन्माननीय, पूज्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली न भरुन येणारी ही पोकळी आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर जे दुःखाचं सावट आलेलं आहे, त्यात मी आणि माझे सर्व कुटुंबीय सहभागी आहोत. मी प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो”.

याबरोबरच त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची एक इच्छा लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणीही सरकारकडे केली. ते म्हणाले, “त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले आणि त्यांच्या सहकाऱ्यामुळे शिवप्रेमींच्या स्वप्नातल्या शिवसृष्टीच्या निर्माणाला सुरुवात झाली. राज्य शासनाला, केंद्र शासनाला तसंच जे कोणी पदाधिकारी आहेत त्यांना मी विनंती करतो की, त्यांची ही इच्छा, फक्त त्यांचीच नव्हे तर ज्या कोणाचं शिवाजी महाराजांवर प्रेम आहे, जे त्यांना गुरुस्थानी मानतात त्यांची ही शिवसृष्टी लवकरात लवकर पूर्ण होण्याकरता आवश्यक निधी उपलब्ध करुन द्यावा”.