Pune

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर टीका करणे योग्य नाही – खासदार उदयनराजे भोसले

By PCB Author

June 02, 2019

पुणे, दि. २ (पीसीबी) – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका करणे योग्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्यांचे काम खूप मोठे आहे, असे मत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.  उदयनराजे  कात्रज परिसरात होत असलेल्या ‘शिवसृष्टी’ची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी ते बोलत होते.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली  शिवसृष्टीचे काम सुरु आहे.  सध्या देशाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे. या शिवसृष्टीला सरकार मदत करत आहे. पण सर्वांनी या शिवसृष्टीला हातभार लावण्याची गरज आहे,  असे उदयनराजे म्हणाले.

राज्य सरकार बांधणार असलेल्या स्मारकाचे काम कुठपर्यंत आले माहिती नाही, पण शिवस्मारक झाले पाहिजे.  छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते, त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. मागच्या जन्मी माझ्याकडून थोडे पुण्याचे काम घडले असेल, म्हणून मी एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला आलो. मी नेहमीच छत्रपती शिवरायांचे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो,  असे उदयनराजे म्हणाले.