शिवथाळीसाठी आधार कार्डची सक्ती ही अफवा – छगन भुजबळ

0
378

मुंबई,दि.२२(पीसीबी) – गोरगरिबांना सवलतीच्या दरात भोजन देण्याच्या ठाकरे सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘शिवथाळी’ योजनेसाठी आधार कार्डची सक्ती करण्यात आली आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकले असून ही अफवा असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

शिवथाळी योजनेचा फायदा गरीबांनाच मिळावा व या योजनेचा गैरफायदा कुणी घेऊ नये याची आम्ही काळजी घेणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. मात्र, दहा रुपयांच्या या थाळीसाठी फेशियल रेगन्शिशनसाठी फोटो व आधार कार्ड दाखवावे लागेल असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले. यावरून मोठ्या प्रमाणात उलट सुलट बातम्याही पसरल्या. मात्र यात तथ्य नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयानं लोकसत्ताशी बोलताना स्पष्ट केले आहे.

भुजबळ म्हणाले, “या योजनेंतर्गत सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी आणि महानगरपालिका क्षेत्रात किमान एक भोजनालय सुरु करण्यात येणार आहे. हे भोजनालय वर्दळीच्या ठिकाणी असेल. ही भोजनालये दुपारी १२.०० ते २.०० या कालावधीत कार्यरत राहतील. या भोजनालयात दुपारी १२.०० ते २.०० या कालावधीत या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राखीव जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित भोजनालय चालकाची आहे.”

शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच ज्या ठिकाणी ही योजना राबविण्यात येईल तेथील आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना या भोजनालयात सवलतीच्या दराने जेवणास सक्त मनाई असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.