“शिवचरित्र कृतीत आणण्याची गरज!” – प्राचार्य प्रदीप कदम

0
234

पिंपरी, दि. १० (पीसीबी) “आजच्या काळात शिवचरित्र कृतीत आणण्याची गरज आहे!” असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्राचार्य प्रदीप कदम यांनी चापेकर स्मारक, चापेकर चौक, चिंचवड येथे सोमवार, दिनांक ०९ मे २०२२ रोजी केले. पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती अंतर्गत गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत ‘छत्रपती शिवाजीमहाराज आणि आजचा समाज’ या विषयावरील चतुर्थ पुष्प गुंफताना प्रदीप कदम बोलत होते. विक्रांत ओतारी अध्यक्षस्थानी होते; तर उद्योजक धनंजय वाल्हेकर, किसनमहाराज चौधरी, राजेंद्र घावटे, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी कांचन इंदलकर यांना कोविडयोद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना कांचन इंदलकर यांनी, “कोरोना काळात सेवाभावी काम करताना इतिहासप्रसिद्ध हिरोजी इंदुलकर यांचा वंशज असल्याचा अभिमान वाटला!” अशा भावना व्यक्त केल्या. कै. तानाजी शंकरराव वाल्हेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यानमालेचे हे चतुर्थ पुष्प आयोजित करण्यात आले होते. क्षमा शिकलगार यांनी प्रास्ताविक केले. संग्रामसिंह पाटील या बालशहिराने शिवाजीमहाराजांचा पोवाडा सादर केला. व्याख्यानापूर्वी, यशस्वी कदम यांनी निर्मलादेवी प्रणीत सहजयोगाची माहिती दिल्याबद्दल गीतल गोलांडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य प्रदीप कदम पुढे म्हणाले की, “आजचे आमचे जगणे कुटुंबापुरते सीमित झाले आहे; तसेच आम्ही छत्रपती शिवाजीमहाराज यांनाही सीमित केले आहे. वास्तविक देश सामर्थ्यशाली करण्यासाठी शिवचरित्राचा निरंतर अभ्यास केला पाहिजे; कारण ‘शिवाजी’ हा एक महामंत्र आहे.

महाराष्ट्राखेरीज इतर राज्यांमधील तरुण उच्चशिक्षित होतात; मात्र, मराठी तरुण नेत्यांचे वाढदिवस आणि सोशल मीडियामध्ये रमतो. कृतिशील कार्य करणारी आणि देवाला-भावाला कधीही न फसवणारी माणसे खऱ्या अर्थाने अंतर्बाह्य सुंदर असतात. स्वातंत्र्य, समता, एकता, अखंडता, न्यायप्रियता यांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे शिवाजीमहाराज होय. शक्ती, भक्ती, युक्ती या गुणांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. त्यामुळे आमच्या अस्मितेचा, निष्ठेचा मानदंड म्हणून शिवाजीराजे यांच्याकडे पाहिले जाते. ‘यथा राजा तथा प्रजा’ या म्हणीचा विपरीत प्रत्यय आम्हाला येतो आहे. वयाच्या नवव्या वर्षी बालशिवबा तंजावर येथे शहाजीराजे यांच्याकडे गेले असता महाराष्ट्रातील रयतेला स्वातंत्र्य नाही, याची त्यांना जाणीव झाली. बाराव्या वर्षी पुण्यात जिजाऊ माँसाहेब यांच्यासह ते वास्तवास आले. लोहगाव येथे त्यांनी संत तुकाराममहाराज यांना पाहिले अन् त्यांनी भक्तिमार्गाला जाण्याचा निश्चय केला. तेव्हा जिजाऊंनी त्यांना देहू येथे तुकोबांकडे नेले. तुकोबांनी त्यांना राजकारणात सक्रिय होण्याचा उपदेश केला. त्यानुसार वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली. त्याप्रसंगी त्यांच्यासोबत असलेले अठरापगड जातीचे सवंगडी शेवटपर्यंत त्यांच्याशी एकनिष्ठ राहिले.

आजच्या राजकारणी व्यक्तींनी ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. शून्यातून स्वराज्य निर्माण करता येते, हे त्यांनी जगाला दाखवून दिले. एकाच वेळी सहा शत्रूंशी मुकाबला करताना स्वराज्याच्या वाटेत आडवे येणाऱ्या स्वकीयांनाही त्यांनी शासन केले. फिरंगोजी नरसाळा हे चाकणच्या किल्ल्याची लढाई शर्थ करूनही हरल्यावर महाराजांनी त्यांना बळ दिले. स्वराज्यावर अफजलखानाचे संकट आल्यानंतर त्यांनी आपल्या मावळ्यांशी मसलत केली. आजच्या काळात या परिस्थितीचे चित्र वेगळे दिसले असते. आजच्या काळात नेत्यांच्या उपस्थितीशिवाय विवाह पार पडत नाही; परंतु ‘आधी लगीन कोंडाण्याचे…’ असे म्हणणारे तानाजींसारखे सहकारी त्यांना लाभले. तसेच तानाजीसारख्या शेतकऱ्याच्या मुलासाठी रडणारी जिजाऊ ही जगातील एकमेव राजमाता होती. शिवरायांनी जिजाऊंसाठी पाचाड येथे राजवाडा बांधला होता.

आज आमच्या घरात मातापित्यांसाठी जागा नाही. त्यामुळे आज प्रत्येक घरात शिवचरित्राचे संस्कार केले तर कुटुंब, समाज आणि राष्ट्र बलशाली होईल. तसेच आज शिवाजीराजे असते तर त्यांनी जगाचे नेतृत्व केले असते!” शिवशाहीतील रोमहर्षक प्रसंग आणि विविध कविता उद्धृत करीत प्रदीप कदम यांनी आपल्या विषयाची मांडणी केली. व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरे झाली. गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या सदस्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. विजय बोत्रे यांनी सूत्रसंचालन केले. हेमा सायकर यांनी आभार मानले.