शिर्डी संस्थानकडून सरकारने घेतले ५०० कोटींचे कर्ज

0
1428

मुंबई, दि. २ (पीसीबी) – आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने शिर्डीतील साई संस्थानकडून व्याजमुक्त ५०० कोटींचं कर्ज घेतलं आहे. हा निधी राज्य सरकार अपूर्ण असलेल्या निळवंडे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वापरणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर नगर जिल्ह्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

निळवंडे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने शिर्डी साई संस्थानकडे कर्जाची मागणी केली होती. शिर्डी साई संस्थानचे प्रमुख सुरेश हावरे यांनी निर्णय घेत राज्य सरकारला हे कर्ज मंजूर केले. राज्य सरकारने आतापर्यंत इतके मोठे कर्ज कुठल्याही संस्थेकडून घेतलेले नाही. ही पहिलीच वेळ आहे. तसेच हे कर्ज फेडण्यासाठी सरकारला कुठलीही कालमर्यादा घालण्यात आलेली नाही.

गेल्या १ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कर्जाच्या मुद्द्यावर बैठक झाली होती. त्याचा प्रस्ताव शिर्डी साई संस्थानकडे पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला साई संस्थानने शनिवारी मंजुरी दिली. दोन टप्प्यात हे कर्ज राज्य सरकारला दिलं जाणार आहे. शिर्डी साई संस्थान आणि गोदावरी-मराठवाडा सिंचन विकास महामंडळात याबाबत करार करण्यात आला. साई संस्थानच्या इतिहासात हे प्रथमच घडले, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

निळवंडे सिंचन प्रकल्पाचं काम बऱ्याच कालावधीपासून रखडलं आहे. या प्रकल्पाचा खर्च हा १२०० कोटी इतका आहे. यासाठी शिर्डी संस्थानने ५०० कोटींचे कर्ज दिले आहे. तर जलसंपदा विभागाला यासाठी आर्थसंकल्पातून ३०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पासाठी आगामी अर्थसंकल्पात ४०० कोटींची तरतूद करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. येत्या दोन वर्षात सिंचन प्रकल्पाचा डावा आणि उजवा कलवा बांधून पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.