शिर्डी-पाथरी वाद चिघळण्याची चिन्हे

0
466

नाशिक, दि.१८ (पीसीबी) – शिर्डीच्या साईबाबांच्या जन्मस्थळावरुन नवा वाद उफाळला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात ‘साईबाबांचे जन्मस्थळ असलेल्या पाथरी गावाचा शंभर कोटींचा विकास आराखडा तयार आहे’ असे वक्तव्य केले होते. याच वक्तव्यावरुन शिर्डीकर आक्रमक झाले आहेत.

तसेच शिर्डी साईबाबांच्या जन्मभूमी वादावार शुक्रवारी शिर्डी ग्रामस्थ आणि पंचकृषीतील प्रमुखांची बैठक पार पडली. शिर्डी पंचकृषीतील २५  गावांचे प्रतिनीधी या बैठकीला उपस्थित होते. यामध्ये रविवारपासून शिर्डी आणि पंचकृषीतील गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आज ५  वाजता शिर्डी ग्रामस्थ द्वारकामाई मंदिरासमोर ग्रामसभा घेणार असून, आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहेत. पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळ असल्याच्या दाव्याने शिर्डीकरांनी तीव्र नापसंती व्यक्त करत आहेत. राहाता, अस्तगाव, पुणतांबा, डोहळे, एकरूखे, शिंगवे, नांदुर्खी, सावळीविहीर, निघोज निमगाव, वडझरी, पिंपळस, साकुरीसह इतर गावातील पदाधिकारी आणि लोकांनीही बंद पाळण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, शिर्डी विरूद्ध पाथरी वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिर्डी बंदला एकूण २५  गावांनी पाठिंबा दिला आहे. शिर्डीत देश आणि विदेशातून साईबाबांचे भक्त भक्तीभावानं दर्शनासाठी येत असतात. मात्र रविवारपासून भक्तांना साईबाबांचे दर्शन घेता येणार नाही. शिर्डीकरांनी बेमुदत बंद पुकारल्याने भाविकांना आता दर्शनासाठी सबुरी ठेवावी लागणार आहे.