शिर्डीतील मोदींच्या कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी राज्य सरकारकडून २ कोटींची उधळपट्टी

0
853

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – एकीकडे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमासाठी सरकारी तिजोरीतून तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण राज्य सरकारकडून केली जात आहे. येत्या १९ तारखेला शिर्डी येथे होणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या ई-गृहप्रवेश कार्यक्रमाला माणसे जमावीत म्हणून ग्रामविकास खाते २ कोटी रुपयांची उधळपट्टी करत आहे.

या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थित असणार आहे. या कार्यक्रमाला येणाऱ्या लोकांना नाश्ता, येण्या-जाण्याची सोय आणि बसवर बॅनर लावण्यावर सरकार तिजोरीतून खर्च केला जात आहे. २० हजार घरकुल लाभार्थी कुटुंबीयांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. जवळपास ४० हजार लोक उपस्थित राहण्याचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण ८०० बसमधून ४० हजार लोक येणार आहेत. त्यासाठी २ कोटी रुपये एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी जोरदार टीका केली आहे. “राज्य दुष्काळात होरपळत आहे, तिजोरीत खडखडाट आहे आणि राज्य कर्जबाजारी झाले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीत होणाऱ्या कार्यक्रमाला गर्दी जमा करण्यासाठी शासकीय तिजोरीतून २ कोटी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. मोदी लाट पूर्णपणे ओसरली असल्यानेच शासकीय खर्चाने  माणसे आणावी लागत आहेत.”, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.