शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घ्यायचंय? आधी सोडतो म्हणत दाखवला बाहेरचा रस्ता, ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यातील वाद चव्हाट्यावर

0
235

शिर्डी, दि.२ (पीसीबी): साईबाबांची शिर्डीनगरीत वारंवार वादाच्या घटना घडताना दिसत आहेत. काकड आरतीसाठी पैशांची मागणी, प्रसारमाध्यमांवरील निर्बंध आणि ड्रेसकोडचा वाद ताजा असतानाच आता ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. ग्रामस्थांना 31 डिसेंबरच्या रात्री साईबाबांचे दर्शन घेण्यास रोखल्याने हा वाद उफाळल्याची माहिती समोर आली आहे

नेमकं प्रकरण काय?
31 डिसेंबरच्या रात्री म्हणजे जवळपास साडेअकरा वाजेच्या सुमारास काही ग्रामस्थ, मानकरी, आणि पदाधिकारी शनिगेट जवळील प्रशासकीय द्वाराजवळ जाऊन थांबले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी धावत आले. तुम्ही इथे कसे आलात? चला मागे चला, असं म्हणत काही पदाधिकाऱ्यांना त्यांनी बाहेर काढलं. यावेळी त्यांनी कॅमेरा चित्रीकरण सुरु केलं. त्यांनी सर्व ग्रामस्थांना त्याठिकाणाहून बाहेर काढलं. त्यानंतर मोठा लवाजामा घेवून बगाटे पुन्हा शनिगेटकडे गेल्यानं शिर्डी ग्रामस्थांनी त्यांचा निषेध व्यक्त केला.
मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी ज्या ग्रामस्थांना साईबाबांचे दर्शन घेण्यापासून रोखले त्यामध्ये शिर्डीचे नवविर्वाचित नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, माजी विश्वस्त तथा शिवसेनेच्या नगरसेविका अनिता जगताप, माजी विश्वस्त सचिन तांबे, नगरसेवक सुजीत गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप यांचादेखील समावेश आहे.

तुम्हाला सर्वात प्रथम सोडतो, असं म्हणत हुल देवून कार्यकारी आधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांना शनिगेट जवळून बाहेर काढले. यावेळी शिर्डी ग्रामस्थ आणि बगाटे यांच्यात बराच वेळ बाचाबाची देखील झाली. बराच वेळ गोंधळ झाल्यानंतर ग्रामस्थांचा रोष पाहता मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दिलगीरी व्यक्त केली. मात्र ग्रामस्थांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याने अनेक ग्रामस्थांनी मंदिरात न जाता बाहेरूनच साईंचे दर्शन घेत बगाटे बगाटे यांचा निषेध केला. त्यानंतर नगराध्यक्षांसह अनेक गावकऱ्यांनी दर्शनासाठी मंदिरात न जाता कळसाचे दर्शन घेणे पसंत केले.
“नववर्षनिमित्ताने आम्ही साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो. फक्त दर्शन घेवू द्या, एवढीच प्रांजळ मागणी करत होतो. मात्र तरीही शिर्डीकरांना आत सोडले नाही. याउलट अधिकाऱ्यांनी त्यांच्या सोबतच्या व्हीआयपींना मंदिरात सोडले”, असा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका अनिता जगताप यांनी केला. दरम्यान, नवीन वर्षाच्या प्रारंभाला साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या ग्रामस्थांना मिळालेली वागणूक नक्कीच निंदणीय असल्याचा सूर आता शिर्डीत उमटू लागला आहे.