Banner News

शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे नाव आठ दिवसांत निश्चित होणार – सुप्रिया सुळे

By PCB Author

December 01, 2018

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोण लढणार हे आठ दिवसांत निश्चित केले जाणार आहे. या मतदारसंघात पवार कुटुंबियांपैकी कोणीही निवडणूक लढवणार नसल्याचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.

जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नारायणगाव येथे दोन दिवसांपूर्वी घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शिरूर लोकसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादीचा उमेदवार कोण हे आठ दिवसांत निश्चित होणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून खासदार शिवाजीराव आढळराव पुन्हा मैदानात असणार आहेत. त्यांच्याकडून सलग तीन निवडणुकांत राष्ट्रवादीचा पराभव झालेला आहे. तरीही आगामी निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातच सरळ लढत होणार आहे. त्यामुळे दोन-तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार आढळराव पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण?, असा प्रश्न विचारला जात आहे.

या पार्श्वभूमीवर नारायणगाव येथे मेळाव्यासाठी आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येत्या आठ दिवसांत शिरूरचा राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित केला जाणार असल्याचे सांगितले. तसेच कार्यकर्त्यांनीही निवडणुकीच्या तोंडावर उमेदवार निश्चित करण्याऐवजी आताच नाव जाहीर करावा, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे खासदार सुळे यांनी आठ दिवसात उमेदवाराचे नाव जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीकडून विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, माजी आमदार विलास लांडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, देवदत्त निकम, मंगलदास बांदल, चंदन सोंडेकर यांची नावे चर्चेत आहेत.