शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा तिढा कायम; सर्वमान्य उमेदवार न दिल्यास राष्ट्रवादीचा पराभव अटळ

0
915

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या तरी शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार अद्याप निश्चित होत नाही. डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी देण्याच्या इराद्याने राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतल्यापासून पक्षात प्रचंड अस्वस्थता आहे. कोल्हे यांना उमेदवारी दिल्यास पक्षात बंडाळी निश्चित मानली जात असून, कार्यकर्ते मनापासून काम करतील की नाही?, याबाबत पक्ष नेतृत्वालाच खात्री वाटेनासे झाले आहे. विलास लांडे यांना डावलल्यास भोसरी मतदारसंघात राष्ट्रवादीची साथ शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शिरूरच्या ग्रामीण भागात विलास लांडे यांच्याबाबत नागरिकांमध्ये फारसे चांगले मत नाही. त्यामुळे दुहेरी कात्रीत सापडलेल्या राष्ट्रवादीला सर्वमान्य होईल, असा उमेदवार देण्याची कसरत करावी लागणार आहे. तसे झाले तरच शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या आशा पल्लवित राहतील, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश असणाऱ्या शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादी विरूद्ध शिवसेना अशी सरळ लढत होणार हे निश्चित आहे. या दोन्ही मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिल्यास त्याचा फटका राष्ट्रवादीला बसणार आहे. दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार शड्डू ठोकून तयार आहेत. राष्ट्रवादीने मावळ मतदारसंघात अजितदादांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव निश्चित केले आहे. परंतु, शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीवरून गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे.

शिरूर मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादीने त्यांचा पक्षात प्रवेश करून घेतला. डॉ. कोल्हे हे शिवसेनेतून राष्ट्रवादीत आले. परंतु, कोल्हे हे आयात उमेदवार असल्याने त्यांना पक्षातूनच प्रचंड विरोध होऊ लागला आहे. हा विरोध कमी करण्याचा एक भाग म्हणून अजितदादांनी मंचरमध्ये घेतलेल्या सभेत उमेदवारीबाबत थेट नागरिकांनाच प्रश्न विचारले. त्यावेळी अमोल कोल्हे यांचे नाव घेतल्यानंतर नागरिकांनी एकच जल्लोष केला. परंतु, अजितदादांनी भोसरीत झालेल्या सभेत हाच राजकीय डाव खेळला असता, तर नागरिकांनी विलास लांडे यांच्या बाजूने कौल दिला असता. शिरूरमध्ये अन्य नेत्याच्या बाजूने कौल मिळाला असता. त्यामुळे अजितदादांच्या या राजकीय खेळीची पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येच उलटसुलट चर्चा सुरू आहे.

उमेदवारीसाठी अमोल कोल्हे यांचे नाव पुढे आल्यानंतर भोसरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीत अस्वस्थता पसरली आहे. कोल्हे यांची उमेदवारी जाहीर झाली तर भोसरीत कधीही राजकीय भूकंप होईल, अशी स्थिती आहे. कोल्हे उमेदवार असल्यास राष्ट्रवादीचे भोसरीतील कार्यकर्ते मनापासून काम करतील की नाही, याबाबत पक्षाच्या नेत्यांनाच आता खात्री राहिलेली नाही. त्यामुळे कोल्हे यांच्या नावाबाबत पक्षामध्ये फेरविचार सुरू असल्याचे समजते. पक्षाचे दुसरे इच्छुक उमेदवार विलास लांडे यांना उमेदवारी दिल्यास हा निर्णय पक्षाच्या त्या त्या भागातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना मान्य होईलच, असे चित्र नाही. लांडे यांना शिरूर मतदारसंघाच्या ग्रामीण भागातून साथ मिळेल की नाही याबाबतही साशंकता आहे. दुसरीकडे लांडे यांना उमेदवारी डावलणे भोसरी मतदारसंघात शिवसेनेच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी दुहेरी कात्रीत सापडल्याचे पाहायला मिळत आहे.

शिरूरच्या ग्रामीण भागातील एक सामान्य कार्यकर्ते चंदन सोंडेकर हे देखील राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी आशेने पाहत आहेत. त्यांच्या नावाला पक्षातून अद्याप कोणीही विरोध केलेला नाही. कोल्हेंचा पक्ष प्रवेश, कोल्हेंना भोसरी विधानसभा मतदारसंघातून झालेला विरोध, लांडे व समर्थकांनी व्यक्त केलेली नाराजी, या सर्व पार्श्वभूमीवर चंदन सोंडेकर यांना पक्ष कार्यकर्त्यांकडून चांगले समर्थन मिळत आहे. अशा परिस्थितीत शिरूर मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा सोडवण्यासाठी राष्ट्रवादीला मोठी कसरत करावी लागणार आहे. तारखा जाहीर झाल्या, तरी उमेदवारी ठरत नसल्याने मतदारसंघात राष्ट्रवादीबाबत चुकीचा संदेश गेला आहे. राष्ट्रवादीतील या सर्व घडामोडींमुळे शिवसेनेमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सर्वमान्य उमेदवार न दिल्यास शिरूरमध्ये सलग तिसऱ्यांदा राष्ट्रवादीचा पराभव अटळ असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.