शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीकडून विलास लांडे हेच बळीचा बकरा बनणार की चंदन सोंडेकरांना लॉटरी लागणार?

0
4846

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून कोण लढणार हे अद्याप निश्चित होत नसले तरी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी मात्र निवडणुकीच्या लाल मातीत उतरण्यासाठी लंगोट बांधल्याचे चित्र आहे. मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांवर गेल्या साडेचार वर्षांत चुकून कधी तरी तोंड उघडलेल्या लांडे यांनी आता अचानकपणे मोठी दुर्बिण लावून अनेक प्रश्न शोधून काढले आहेत. या प्रश्नांची फलकबाजी करून त्यांनी स्वतःलाच आजमावून पाहिले असले, तरी मी राष्ट्रवादीकडून शिरूरमध्ये लढणारच, असे सांगण्याचे धाडस मात्र अद्याप तरी त्यांनी केलेले नाही. पालकमंत्री गिरीश बापट यांनी काही दिवसांपूर्वीच लांडे यांची उमेदवारी म्हणजे बळीचा बकरा असल्याची केलेली टिका आणि लांडे यांनी लढण्याबाबत बाळगलेले मौन बरेच काही सांगणारी आहे. लांडे यांची शिरूरमध्ये डाळ शिजणे किती अवघड आहे, हे खुद्द राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुद्धा माहिती आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीकडून शेवटच्या क्षणी अचानकपणे नवीन चेहऱ्याला संधी मिळणार की लांडे हेच दुसऱ्यांदा बळीचा बकरा बनणार हे पाहावे लागणार आहे.

पिंपरी-चिंचवडचा समावेश होणाऱ्या मावळ आणि शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघांपैकी मावळ मतदारसंघातील राजकीय परिस्थिती “ठंडा ठंडा कूल कूल” असताना शिरूर मतदारसंघात मात्र वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. या मतदारसंघात चौथ्यांदा लढण्यासाठी शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शड्डू ठोकून तयार आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा राजकीय पैलवान कोण?, हे मात्र निवडणूक तोंडावर आली तरी अद्याप निश्चित होत नाही. शिरूरमध्ये शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी असाच सामना होणार हे जवळपास निश्चित आहे. कारण आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होण्याची शक्यता अधिक दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या शिरूरमधून खासदार आढळराव पाटील हे चौथ्यांदा शिवसेनेचे उमेदवार असतील. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा कोण? याबाबत उत्सुकता आहे.

शिरूरमध्ये राष्ट्रवादीकडून भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, मंगलदास बांदल, चंदन सोंडेकर आणि प्रदीप कंद यांची नावे चर्चेत आहेत. त्यापैकी प्रदीप कंद यांनी आमदारकी बरी असा पवित्रा घेतल्याचे सांगितले जाते. मंगलदास बांदल यांना राजकीय बांधणी व्यवस्थित करता आली नसल्याचे म्हटले जाते. बांदल यांच्या नावाला राष्ट्रवादीतूनच अनेकांचा विरोध असल्याचे समजते. पक्षाने त्यांचा विचार करावा, असे राजकीय चित्र तयार करण्यात बांदल यांना अपयश आल्याचा हा परिणाम आहे. तिसरे इच्छुक उमेदवार चंदन सोंडेकर यांनी पक्ष उमेदवारी देणार की नाही अशा विचारात न पडता शरद संपर्क अभियानाद्वारे शिरूर मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यांनी गाठीभेटी आणि थेट जनतेशी संपर्क साधत निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. सोंडेकर हे राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना मान्य होणारे इच्छुक उमेदवार ठरले आहेत. त्यांना पक्षातीन स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. परंतु, राष्ट्रवादीत धनदांडग्यांनाच किंवा कुटुंबातील सदस्यांनाच उमेदवारी देण्याची प्रथा आणि परंपरा आहे. राजकारणातील ही कालबाह्य झालेली प्रथा आणि परंपरा राष्ट्रवादी मोडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रवादीचे चौथे इच्छुक उमेदवार विलास लांडे यांनी शिरूर मतदारसंघात आता कुठे फलकबाजीला सुरूवात केली आहे. सर्व प्रमुख रस्त्यांच्या बाजूने विविध प्रश्न उपस्थित केलेले फलक लावून विलास लांडे यांनी स्वतःलाच आजमावण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीची सत्ता असताना हे प्रश्न सोडवण्यासाठी लांडे यांना कोणीही अडवले नव्हते. परंतु, आता निवडणूक जवळ आल्यानंतर जनतेपर्यंत पोचण्यासाठी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांचा त्यांनी हत्यार म्हणून वापर केला आहे. या फलकबाजीमुळे लांडे यांच्या नावाची चर्चा होत असली तरी जनतेला ते अपील झाले का?, याबाबत मात्र शंका आहे. लांडे यांनी लोकसभा लढण्याच्या इराद्याने मतदारसंघात फलकबाजी केली असली तरी ते स्वतःच निवडणूक लढवण्याबाबत अजून तरी साशंक असल्याचे चित्र आहे. कारण त्यांनी मीच लढणार असल्याचे अजून तरी कुठेही सांगितलेले नाही. अशा वेळी पालकमंत्री गिरीश बापट यांनी काही दिवसांपूर्वीच हा विलास साडेचार वर्षे होता कोठे? त्याला आताच कसे प्रश्न पडले?, असे प्रश्न उपस्थित करून लांडे यांनी फलकबाजीतून केलेल्या वातावरणनिर्मितीवर पाणी फेरले.

पालकमंत्री गिरीश बापट एवढ्यावरच थांबले नाहीत, तर शिरूरमधून विलास लांडे यांची उमेदवारी म्हणजे बळीचा बकरा असल्याची थेट टिका करून राष्ट्रवादीची हवाच काढून घेतली आहे. बापट यांच्या या टिकेनंतर लांडे यांच्याबाबत संपूर्ण शिरूर मतदारसंघात योग्य तो संदेश गेला आहे. लांडे यांच्या उमेदवारीकडे शिरूरमधील मतदार बळीचा बकरा म्हणूनच पाहतील, अशी व्यवस्था बापट यांनी करून ठेवली आहे. ती लांडे आणि राष्ट्रवादीसाठी निवडणूक प्रचारात महागात पडण्याची चिन्हे आहेत. लांडे यांनी फलकबाजीतून अनेक प्रश्न उपस्थित केले असले, तरी शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अद्यापपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यावरूनच त्यांनी लांडे यांच्या संभाव्य उमेदवारीला किती महत्त्व दिले आहे, हे स्पष्ट होत आहे. लांडे यांची शिरूर मतदारसंघात कितपत डाळ शिजणार, हे खुद्द राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुद्धा माहिती आहे. त्यामुळे पक्ष लांडे यांनाच दुसऱ्यांदा बळीचा बकरा बनवणार की शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीच्या नेत्यांना सर्वमान्य होईल, असा नवीन चेहरा उमेदवार म्हणून देणार याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे.