शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटलांचा वारू राष्ट्रवादीने रोखला; डॉ. अमोल कोल्हेंचा ५८ हजार ४८३ मतांनी विजय

0
883

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचा विजयरथ यंदा राष्ट्रवादीने रोखला. चौथ्यांदा खासदार होण्याचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचे स्वप्न राष्ट्रवादीचे नवखे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी धुळीस मिळवले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ३ लाखांपेक्षा जास्त मताधिक्य घेत विजयी झालेले आढळराव पाटील यंदा ५८ हजार ४८३ मतांनी पराभूत झाले. शिवाजीराव आढळराव पाटील यांना ५ लाख ७७ हजार ३४७ मते, तर राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे यांना ६ लाख ३५ हजार ८३० मते मिळाली. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल ओव्हाळ यांना ३८ हजार ७० मते पडली. तसेच ६ हजार ५१ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी २९ एप्रिल रोजी मतदान झाले होते. पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी, पुणे शहरातील हडपसर तसेच खेड-आळंदी, आंबेगाव, शिरूर, जुन्नर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात एकूण २१ लाख ७३ हजार ४८४ मतदार होते. त्यातील १२ लाख ९२ हजार ३८१ मतदारांनी मतदान केले होते. बालेवाडी येथील क्रीडा संकुलात गुरूवारी मतमोजणी पार पडली. मतमोजणीच्या एकूण २३ फेऱ्या पार पडल्या. सुरूवातीला सकाळी आठ वाजता टपाली मतदानाची मोजणी करण्यात आली. त्यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी आघाडी घेतली.

सकाळी ९ च्या सुमारास मतदान यंत्रांतील मतमोजणीला सुरूवात झाली. राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी मतमोजणीत शिवसेनेचे तीनवेळा खासदार झालेले उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर सुरूवातीपासून घेतलेली आघाडी विजय होईपर्यंत कायम ठेवली. १२ लाख ९२ हजार ३८१ मतदानांपैकी राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे यांना ६ लाख ३५ हजार ८३० मते पडली. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना यांना ५ लाख ७७ हजार ३४७ मते पडली. त्यामुळे डॉ. अमोल कोल्हे यांचा ५८ हजार ४८३ मतांनी विजय झाला.

या मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल ओव्हाळ यांना ३८ हजार ७० मते पडली. त्याचप्रमाणे बहुजन समाज पक्षाचे उमेदवार अफझल कागदी यांना ७ हजार २४७ मते पडली. याशिवाय ६ हजार ५१ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला आहे.