Banner News

शिरूरमधून लोकसभेवर निवडून नाही आलो, तर पवारांची औलाद सांगणार नाही – अजित पवार  

By PCB Author

January 06, 2019

शिरूर , दि. ६ (पीसीबी) – शरद पवारसाहेबांनी  आणि पक्षाने आदेश दिल्यास  शिरूर लोकसभा मतदारसंघातून  निवडणूक  लढवण्यास मी तयार आहे, असे सांगून मीच येथून  निवडून येईल, नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही, अशा खास शैलीत राष्ट्रवादीचे नेते व  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (रविवार) येथे सांगितले.  

शिरूरमध्ये एका कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, मी शिरूरमधून उमेदवारी फॉर्म भरला; तर मीच निवडून येईल, नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही, अशा आक्रमक भाषेत त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, मी  राष्ट्रवादीतील दोघा – तिघांना सांगतोय, लोकसभा लढवा निवडून आणायची जबाबदारी माझी.  तर ते “नको राव दादा, मला आमदारच व्हायचंय’  असे म्हणतायेत. असला पुळचटपणा ते करत आहेत.

मी कालच पवारसाहेबांना सांगितले की, शिरूर लोकसभेसाठी तुम्हाला योग्य उमेदवार मिळत नसेल, तर आपली लढायची तयारी आहे. हयगय करणार नाही. या मतदारसंघासाठी पक्ष जी जबाबदारी देईल, ती उचलायची तयारी आहे. मी जे बोलतो, ते करतोच, हे लोकांना चांगलेच माहिती आहे. त्यामुळे पक्ष जो आदेश देईल, तो शिरसावंद्य मानून काम करू, असे अजितदादा यावेळी म्हणाले.

शिरूर लोकसभेला, विधानसभेला काय गंमत होते ते कळतच नाही. राष्ट्रवादीकडून त्यांच्याविरोधात कुणीही उभे राहिले तरी निवडून येईल, अशी सध्याची परिस्थिती आहे. तरीही मागे का सरायचे हा प्रश्नच पडतो. या मतदार संघासाठी पक्ष जी जबाबदारी देईल, ती उचलायची तयारी आहे, असेही ते यावेळी म्हणाले.