शिरगावात एस आर टी पध्दतीने कोरड्या शेतातच भात लागवड

0
621

शिरगाव(मावळ), दि. ८ (पीसीबी) – शिरगाव येथे एस आर टी तंत्रज्ञानाचा वापर करून मागील वर्षीच्याच बेडवर भात लागवड करण्याचा आगळावेगळा प्रयोग शिरगाव येथील युवा शेतकरी प्रवीण साहेबराब गोपाळे यांनी केला आहे. गोपाळे हे आपल्या शेतात गेल्या तीन ते चार वर्षापासून हा प्रयोग करत आहेत आणि त्यात त्यांना मोठ्या प्रमाणावर यश मिळत आहे.एस.आर टी या तंत्रज्ञानाच्या साह्याने जर भात लागवड केली तर दरवर्षी लागणाऱ्या खर्चात पेक्षा सुमारे ५० टक्के खर्च कमी येतो त्यामुळे हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू पाहत आहे.

जर या पद्धतीने भात लागवड केली तर येणारे उत्पादनही पारंपारिक लागवडी पेक्षा दुपटीने जास्त येते शिवाय पिकांची रोग प्रतिकार शक्ती जास्त असते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे उगवणशक्ती प्रचंड चांगली राहत असल्याने दुबार पेरणीचा त्रास वाचतो आणि पिकांचा रंग आणि जमिनीचा पोत चांगला राखता येतो. असा अनुभव यावेळी त्यांनी बोलून दाखवला . या पद्धतीने भात पेरणी करण्यासाठी चिखल करण्याची गरज नसल्याने टोकन पद्धतीने लावणी करावी लागते त्यामुळे रोप टाकून लावणे हि किचकट प्रक्रिया करावी लागत नाही.शिवाय मागील वर्षी तयार केलेले वाफेच यावर्षी वापरता येतात.से केल्याने ट्रक्टरने चिखल करून जमिनीत असणारे सूक्ष्मजीव मरण्याचा धोका अजिबात राहत नाही त्यामुळे भाताचा रोपाची वाढ आणि रोग प्रतिकारक शक्ती विलक्षण वाढते . पुढे भातावर पडणारी कीड,करपा रोग कमी पडतो.आणि अगदी कोरड्या शेतातच याची लावणी करता येत असल्याने पावसाची वाट पाहत थांबावे लागत नाही .

या पद्धतीने भात लागवड करण्यासाठी गोपाळे यांनी एक लोखंडाचा सांगाडा तयार केला आहे त्यामुळे बियाणे जास्त वरती राहत नाही आणि जास्त खोलहि जास्त नाही . भात पेरताना दोन रोपांमधील अंतर ५ इंच व दोन रांगेमधील अंतर अर्धा ते एक फुट ठेवले आहे असे केल्याने सर्व रोप आणि सर्व रांगा सारख्या दिसतात शिवाय प्रत्येक रोपाला नैसर्गिक आणि मोकळी हवा लागते त्यामुळे पिकातील आंतरमशागत करण्यासाठी अजिबात त्रास होत नाही आणि पर्यायाने कामगार कमी लागतात.या पद्धतीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट म्हणजे एकदा वाफे तयार केले कि ते पुढील पाच वर्ष लागवड करण्यासाठी वापरता येतात त्यामुळे दरवर्षी नागरणी,कुळवणी,माती भाजनी, यावरती होणारा प्रचंड खर्च वाचतो.आणि त्यामुळे जमिनीची होणारी विनाकारण धुपहि होत नाही. या पद्धतीचा वापर करून पिक घेतले तर याच शेतात दुसरे पिक घेण्यासाठी रासायनिक खताची गरज अर्ध्यापेक्षा कमी होते त्यामुळे शेतकरी आपला खिसा वाचवण्यात यशस्वी होतो.