शिक्षण विभाग भ्रष्टाचाराने बरबटलेला, गैरव्यवहारांचे ‘रॅकेट’, – अतिरिक्त आयुक्त, शिक्षणाधिकारी अन् ठेकेदारांची ‘सेटिंग’, महासभेत नगरसेवकांचा हल्लाबोल – शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना शासन सेवेत पाठविण्याची मागणी

0
334
Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC). *** Local Caption *** Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC). File Photo

पिंपरी, दि. १३ ( पीसीबी) – महापालिका शाळेतील दर्जात सुधारण होत नाही. त्यामुळे महापालिकेच्या शाळेत विद्यार्थी येत नाहीत. परिणामी, पटसंख्या घटत आहे. गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या शिक्षकांचे शिकविण्यापेक्षा ‘एजंटगिरी’कडे लक्ष आहे. काही शिक्षक अनेक वर्षांपासून एकाच शाळेत ठाण मांडून बसले आहेत. शिक्षण विभागात गैरव्यवहारांचे मोठे ‘रॅकेट’ आहे. अतिरिक्त आयुक्त, शिक्षणाधिकारी, ठेकेदारांची ‘सेटिंग’ असून शिक्षण विभाग भ्रष्टाचाराचे कुरण झाल्याचा हल्लाबोल सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. निष्क्रिय शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना राज्य सेवेत परत पाठविण्याची मागणी करण्यात आली.
पिंपरी – चिंचवड महापालिकेची ऑक्टोबर महिन्याची सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि.१३) पार पडली. महापौर उषा ढोरे अध्यक्षस्थानी होत्या. महापालिकेचे काळभोरनगर येथील माध्यमिक विद्यालय खासगी संस्थेला चालवायला देण्याचा प्रस्ताव विषयपत्रिकेवर होता. त्यावरील चर्चेत नगरसेवकांनी शिक्षण विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले.

राष्ट्रवादीचे भाऊसाहेब भोईर म्हणाले, शिक्षण विभागात सगळा सावळा गोंधळ आहे. शिक्षकांच्या बदलीसाठी शिपाई काम करतोय. वीस वर्षांपासून तो शिपाई एकाच विभागात कार्यरत आहे. बदलीसाठी पाच पाच लाख रुपये मागितले जातात. मोठे रॅकेट आहे. ठराविक ठेकेदार व अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहे. एक शिक्षक जमीन खरेदी विक्री करणारा एजंट आहे. अनेक शिक्षक ठाण मांडून बसले आहेत. तीन वर्षांपेक्षा अधिक काळ शिक्षक एका ठिकाणी असू नये, त्यांची बदली करायला हवी. बदल्यांसाठी नगरसेवकांचा हस्तक्षेप होतोय. अतिरिक्त आयुक्त गावच्या पाटलांसारखे वागतात. कोणतेही काम सांगितले की चर्चा करतो, बघतो, अशी उत्तरे देतात. शिक्षण समितीच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे लवकर सहीच करत नाहीत. अधिकारी बदली होऊन जातात. नुकसान आमच्या मुलांचे होते.
भाजपच्या आशा शेंडगे म्हणाल्या, महापालिका शाळेतील विद्याथ्र्यांकडे मुलभूत ज्ञान सुद्धा नाही. ठेकेदाराचे भले कसे होईल हेच पाहिले जाते. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, शिक्षणाधिकारी आणि ठेकेदार यांची सेटिंग झाली आहे. तर, शिक्षण विभाग भ्रष्टाचाराने बरबटल्याचा आरोप भाजपच्या सीमा सावळे यांनी केला. भाजपचे हर्षल ढोरे म्हणाले, नगरसेवक, अधिकाऱ्यांची मुले महापालिका शाळेत दाखल करा. शिक्षण समिती म्हणजे ‘सब गोलमाल है, सब गौलमाल है’.
शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी दिल्ली दौरा केला. पण, त्याचे फलित काय झाले. तर, स्मार्ट सिटीच्या निविदा काढल्या. ठेकेदारांना पोसले जात आहे. अनेक वर्षांपासून तेच ठेकेदार आहेत. त्यांची चौकशी करावी. एका अधिकाऱ्याने तात्पुरत्या पदभारात रात्री साडेदहा वाजता फाईल काढून १४ कोटीच्या विषयावर स्वाक्षरी केली होती. शिक्षण विभाग भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. चार वर्ष झाले शाळांमध्ये काहीच सुधारणा नाही.
– शिवसेनेच्या मीनल यादव म्हणाल्या, शिक्षण विभागात भोंगळ कारभार सुरु आहे. कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. आमच्या प्रभागातील विषय असताना आम्हाला त्याची कल्पना देण्याची तसदीही अधिकाऱ्यांनी घेतली नाही. तीन – चार ठेकेदार शिक्षण विभाग चालवित असल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधी पक्षनेते राजू मिसाळ म्हणाले, शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे अगोदरच ठेकेदाराला काम चालू करण्यास कसे सांगू शकतात ? त्यांचा ठराव करुनही राज्य सेवेत का पाठवू शकलो नाही ? त्यांना कोणाचा वरदहस्त आहे ? आयुक्तांनी छडी हातात घेऊन शिक्षण विभागाचे ‘ऑपरेशन’ करावे.

– सभागृह नेते नामदेव ढाके म्हणाले, महापालिका शाळांमध्ये मागील काही वर्षांपेक्षा थोडीसी प्रगती झाली आहे. पण, ती समाधानकारक नाही. विद्याथ्र्यांची गुणवत्ता वाढली पाहिजे. खासगी शाळांपेक्षा महापालिकेच्या शिक्षकांना पगार जास्त आहे. शिक्षकांनी पाट्या टाकण्याचे काम करु नये. अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या शिक्षक, बदल्यांसाठी पैशे घेणाऱ्या शिपायाची तत्काळ बदली करावी. अशी सूचना त्यांनी केली. त्यावर महापौर उषा ढोरे यांनी खासगी संस्थेला महापालिका शाळा चालविण्यास देण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला. शिक्षण समितीमार्फत याबाबतचा प्रस्ताव पुन्हा महापालिका सभागृहासमोर आणण्याचे आदेशही महापौरांनी दिले.
एकाच शाळेत ठाण मांडलेल्या शिक्षकांच्या बदल्या होणार
महापालिका शाळेतील विद्याथ्र्यांना स्मार्ट शिक्षण मिळणे आवश्यक आहे. त्यातून शहराचे भवितव्य घडणार आहे. त्यासाठी कठोर भूमिका घेतली जाईल. आजपर्यंत शिक्षकांचे लाड केले. यापुढे केले जाणार नाहीत. वर्षानुवर्ष एकाच शाळेत ठाण मांडलेल्या, तीन वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांच्या तत्काळ बदल्या करा असा आदेश महापौर उषा ढोरे यांनी आयुक्तांना दिला. तसेच जमीन खरेदी विक्रीचे काम करणाऱ्या शिक्षकाला निलंबित करण्याचे निर्देशही दिले. महापालिकेच्या अनेक मालमत्ता आहेत. या मालमत्ता कोणालाही वापरायला देण्यापूर्वी नगरसेवकांशी चर्चा करावी. विश्वासात घ्यावे. नगरसेवकांची परवानगी मिळाल्यानंतरच विषय सभागृहासमोर आणावेत. आम्ही मालक आहोत. याचे आयुक्तांनी भान ठेवावे असेही महापौर ढोरे म्हणाल्या.