Banner News

शिक्षण मंत्र्यांच्या धारावी मतदारसंघाला मदतीसाठी पुणे शहर, जिल्ह्यातील शिक्षकांना `टार्गेट`, शिक्षणाधिकाऱ्यांच्या सक्तीने मुख्याध्यापक त्रस्त

By PCB Author

May 29, 2020

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या मुंबईतील धारावी मतदारसंघातील नागरिकांना मदतीसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील शिक्षक व मुख्याध्यापकांना रोख अथवा धान्य स्वरुपात मदतीची सक्ती सुरू आहे. मंत्र्याच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी होण्यासाठी स्वतः शिक्षणाधिकारी खुप तत्पर आहेत. त्याबाबत `झुम` बैठकीतून मदत जमा करण्याचे आदेशच ते देत असल्याने शिक्षकांमध्येही प्रचंड अस्वस्थता आहे. रोख मदत जमा करण्यासाठी एका शिक्षकाचा बँक खाते क्रमांक सर्वांना पाठविण्यात आला आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यातील पगार अद्याप झाले नाहीत, तर विनाअनुदानीत सुमारे १५ हजार शिक्षकांना मिळणारा अत्यंत तटपुंजा ४ ते ५ हजार पगारही होत नसल्याने सर्व शिक्षकवृंद संतापला आहे.

कोरोनामुळे धारावीत मोठा कहर झाला आहे. दहा लाख लोकवस्तीच्या या परिसरात दोन हजारावर रुग्ण असल्याने वसाहत बंदिस्त आहे. या परिसरातील कामधंदे बंद असल्याने रोजगार नाही. या लोकांना मदतीसाठी खुद्द शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षकांना साद घातली आहे. पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड मध्ये मिळून १५०० शाळांमध्ये जिल्हा परिषदेचे १३ हजार, महापालिकेचे ४,७०० आणि खासगी ३,५०० शिक्षक व मुख्याध्यापक आहेत. या सर्वांनी मिळून जास्तीत जास्त मदत करावी, असे फर्मान खुद्द शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काढले. त्यांनी शिक्षण संचालक यांच्या मार्फत शिक्षणाधिकारी यांना आदेश दिला. शिक्षणाधिकारी गणपत मोरे यांनी मुख्याध्यापकांची झुम वर मिटींग घेतली आणि मदत गोळा करण्याचे सक्त आदेश दिले. मंत्री महोदयांच्या मतदारसंघात ही मदत द्यायची असल्याने या प्रकरणाची कुठेही वाच्यता होता कामा नये, असा सज्जड दम शिक्षक आणि मुख्याध्यापकांना देण्यात आल्याने खळबळ आहे.

खुद्द मंत्री महोदयांचा आदेश असल्याने शिक्षक सद्या मदत गोळा करत फिरत आहेत. जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील शिक्षकांनी तालुकानिहाय किमान २५ कट्टे तांदुळ पाठवावा असे आदेश आहेत. ज्यांना ते शक्य नसेल त्यांनी एका कट्याला एक हजार रुपये या प्रमाणे रोख स्वरुपातील मदत आकुर्डी येथील शिक्षक श्री. अशोक सोपान जाधव यांच्या खात्यात (आयसीआयसी बँक खाते क्र.१४७८०१००१०७३) गुगल पे द्वारे जमा करावी, असा दम शिक्षणाधिकारी यांनी दिल्याने मुख्याध्यापकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मदत कुठे कशी पाठवायची याचे एसएमएस शिक्षकांना पाठविण्यात आले. मदत गोळा झाली की एखाद्या टेंपो, ट्रकला बँनर लावून धारावीला पोहच करा, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.

कोरोना साठी नागरिकांना मदत करायची तर ती धारावी मतदारसंघात कशासाठी, आमच्या परिसरातील शेतकरी, कामगारांचेही खुप हाल सुरू आहेत, विनाअनुदानित हजारो शिक्षकांना पगार नसल्याने त्यांची उपासमार सुरू आहे त्यांना मदत देऊ अशी भावना मुख्याध्यापकांनी व्यक्त केली. मुख्याध्यापक संघाच्या बैठकीत या प्रकरणाची चर्चा झाली. थेट मंत्र्यांच्या खात्यावर पैसे जमा करावेत, असाही प्रस्ताव पुढे आला. स्थानिक पातळीवर मदत द्यायला सांगितले तर समजू शकते, पण धारावीचा आमच्याशी काय संबंध अशीही भावाना मुख्याध्यापकांनी व्यक्त केल्याचे समजले. मंत्र्यांचे हितसंबंध जपण्यासाठी शिक्षकांना का राबवता, असाही प्रश्न करण्यात आला.

पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका, खासगी शाळा आणि विनाअनुदानीत शाळांचे शिक्षक या मदत योजनेत बिलकूल सहभाग घेणार नाहीत, असेही सांगण्यात आले. या विषयावर मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी कानावर हात ठेवले. दरम्यान, सरकारची तिजोरी खाली असल्याने माध्यमिक शिक्षकांचे एप्रिल महिन्याचे पगार अद्याप झालेले नाहीत. राज्यातील माध्यमिक शिक्षकांची संक्या ५० हजारावर आहे. मागच्या महिन्यात (मार्च२०२०) पगारात २५ टक्के कपात केली. आता मे महिन्यांच्या पगाराची खात्री देता येत नाही. धक्कादायक प्रकार म्हणजे विनाअनुदानीत शाळांच्या शिक्षकांची संख्या १५ हजारावर आहे. भाजपाच्या शासनाने या शिक्षकांना पहिल्या टप्प्यात २० टक्के नंतरच्या टप्प्यात ४० टक्के अनुदान देण्याची घोषणा केली. एकाही घोषणेची पुर्तता नसल्याने हे शिक्षक त्रस्त आहेत. त्यात आता मदत गोळा करण्याची सक्ती होत असल्याने शिक्षक संतापले आहेत. शिक्षणाधिकारी गणपत मोरे यांना वारंवार संपर्क केला असता ते उपलब्ध झाले नाहीत. याच विषयावर व्हिडिओ काँन्फरन्स सुरू असल्याचे त्यांच्या कार्यालयातून समजले.