Chinchwad

शाहूनगर येथे महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

By PCB Author

June 13, 2021

चिंचवड, दि. 13 (पीसीबी)  रस्त्याने पायी चालत जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील 40 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना शनिवारी (दि. 12) रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास शाहूनगर, चिंचवड येथे घडली.  सुषमा संतोष पातकर (वय 40, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शनिवारी रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास शाहूनगर येथील लोहाडे हॉस्पिटलकडून सी के गोयल शाळे मार्गे त्यांच्या घरी जात होत्या. त्या प्रतिक्षा सहकारी गृहनिर्माण संस्था या सोसायटीच्या समोर आल्या असता त्यांच्या गळ्यातील 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेले. त्यानंतर ते चोरटे दुचाकीवरून पसार झाले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.