Pimpri

शालेय साहित्य न मिळाल्याने महापालिकेवर विद्यार्थ्यांचा अर्धनग्न मोर्चा   

By PCB Author

June 26, 2019

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य न मिळाल्याच्या निषेधार्थ आज (बुधवार) महाराष्ट्र राज्य रयत विद्यार्थी विचार मंचाच्या वतीने महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यांना अभिवादन करुन पिंपरी महापालिकेवर विद्यार्थ्यांचा अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला.

पिंपरी चिंचवड शहर उद्योगनगरी म्हणून आशिया खंडात ओळखले जाते. हे शहर कष्टकरी, कामगार, मजूर वर्गाच्या श्रमावर उभारले आहे. या शहरातील कामगार, कष्टक-यांची मुले पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळेत शिक्षण घेत आहेत. महापालिकेचे २०७ बालवाडी, १३० प्राथमिक आणि १८ माध्यमिक शाळा कार्यरत आहेत. बालवाडी ते माध्यमिक शाळेत सुमारे ५५ हजार विद्यार्थी शिकत आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांना मागील २० वर्षापासून वेळेवर शालेय साहित्य मिळत आहेत. यामध्ये गणवेश, पीटी गणवेश असे विविध साहित्य वेळेवर दिले जाते. राजकारणाच्या साठमारीत गतवर्षी विद्यार्थ्यांना वर्षभर शूज मिळालेच नाहीत. मात्र, यंदाचे शैक्षणिक वर्षांस प्रारंभ होऊन आठवडा झाला. तरी शालेय साहित्य मिळालेले नाही.

विद्यार्थी व विद्यार्थिंनीवर गणवेशाअभावी शाळेत यावे लागत आहे. ही बाब महापालिकेसाठी निंदनीय आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व विद्यार्थ्यांना वेळेवर शालेय साहित्य मिळालेले नाही. तसेच महापालिका शालेय साहित्यासाठी डीबीटी मोहीम राबविणार असल्याचे समजते. परंतु, डीबीटी योजना राबविल्यास विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होण्याऐवजी पालकांनाच लाभ होईल, कारण सर्व विद्यार्थी हे गोरगरीब, कष्टकरी मजुराची मुले असल्याने डीबीटीचे सर्व अनुदान पालक खर्च करून टाकतील. त्यामळे सर्व विद्यार्थ्यांना डीबीटी न राबविता पुर्वीप्रमाणे शालेय साहित्य द्यावे, जेणे करुन सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल.