Others

“शाईनवाला पेंट म्हणजे ‘एशियन पेंट’; चार मित्रांच्या चर्चेतून जन्माला आलेल्या ‘एशियन पेंट’ची यशोगाथा

By PCB Author

January 23, 2021

मैत्री हे असं एक सुंदर नातं आहे जिथे सगळं काही आपण बोलू शकतो, ऐकू शकतो. आणि ही एक खूप सुंदर गोष्ट आहे आणि त्यामध्ये एक वेगळीच शक्ती सुद्धा आहे हे आपण सगळेच जाणतो. मैत्रीची महती सांगणारे किती तरी गाणी, सिनेमे आपण बघितले आहेत. तीन चार मित्र एकत्र आले की, गप्पांमध्ये वेळ कसा निघून जातो हे काहीच कळत नाही. किती तरी जवळचे मित्र हे काही वर्षांनी बिजनेस पार्टनर झाल्याचं आपण नेहमीच बघतो.संगीत क्षेत्रातील विशाल-शेखर असतील किंवा क्रिकेट मधील सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी असतील. या सर्व मित्रांनी एकत्र येऊन फक्त वेळ वाया घालवलेला नसतो, तर काही स्वप्न त्यांनी एकत्र बघितले असतात आणि ती स्वप्न ते जगत असतात. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी असेच चार मित्र एकत्र आले होते आणि त्यांच्या एकत्र येण्याने त्यावेळी एक इतिहास घडला होता. जो आज सगळ्यांच्या तोंडी आहे.

तो काळ १९४२ चा होता. तेव्हा भारतावर इंग्रजांचं राज्य होत. त्यामुळे इंग्रज भारतात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर करडी नजर ठेवून होते. भारतीयांसाठी दुसऱ्या देशातून आयात होणाऱ्या कित्येक वस्तूंवर त्यांनी निर्बंध आणले होते. त्यावेळी महात्मा गांधींनी सुद्धा असहकार आंदोलन पुकारलं होतं. आयात बंदी मध्ये इंग्रजांनी ‘पेंट’ म्हणजेच ‘रंगावर’ सुद्धा बंदी आणली होती. उपलब्ध असलेल्या काही पर्यायांपैकी एखादा पेंट लोकांना खरेदी करावा लागायचा. ही बंदी बहुतांश लोकांनी मान्य केली होती. पण, चंपकलाल चोकसी, चिमनलाल चोकसी, सूर्यकांत दाणी आणि अरविंद वकील हे या बंदीला अपवाद होते. यांना ही बंदी मान्य नव्हती. त्यांनी या पेंट बंदी कडे एक बिजनेस संधी म्हणून बघितलं. एक दिवशी, एका गॅरेज मध्ये बसून बोलताना त्यांनी ठरवलं, की आपण चौघांनी मिळून पेंट भारतातच तयार करायचा आणि देशाला ‘आत्मनिर्भर’ करायचं. त्यांनी बिजनेस मॉडेल तयार केलं. मात्र तेव्हा आजसारखे प्रेझेंटेशन वगैरे तयार करावे लागत नव्हते. त्या चारही मित्रांनी १९४२ मध्ये मुंबई मध्ये ‘एशियन पेंट्स एंड ऑईल प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीची स्थापना केली. सुरुवातीला अगदी छोट्या स्वरूपात त्यांनी हे काम सुरू केलं. नवीन असल्याने काही चुका झाल्या, पण त्यांनी एकत्रितपणे त्यावर मार्ग काढून कंपनीला एक आकार दिला.  त्या चौघांनी सुरुवातीला पायी फिरून मुंबई च्या रस्त्यांवर पेंट विकायाला सुरुवात केली. कारण त्यावेळी मार्केटिंगचा दुसरा पर्याय नव्हता. काही दिवसांनी त्यांनी त्यांच्या जवळच्या लोकांना संपर्क साधला आणि त्यांना पेंट चे छोट्या आकारात तयार केलेले पाऊच विकण्यासाठी विनंती करून पेंट ची विक्री वाढवली. पुढे १९५२ पर्यंत एशियन पेंट्स हे फक्त पांढरा, काळा, पिवळा, लाल आणि हिरवा इतकेच रंग तयार करायचे. १९४२ मध्ये सुरू झालेल्या या कंपनीने १९४५ पर्यंत तब्बल ३.५ लाखाचा बिजनेस केला होता. हि रक्कम त्यावेळी खूप मोठी होती. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.. पुढील सात वर्षात म्हणजे १९५२ मध्ये एशियन पेंट्स ने २३ करोड चा विक्रमी व्यवसाय केला होता. हा टर्नओवर म्हणजे त्या काळात खूप मोठी रक्कम होती. वर्षानुवर्षे विविध अडचणींचा सामना करत हा टर्नओव्हर वाढतच गेला..

पण व्यवसाय म्हंटल तर तो आणखी वाढविण्यासाठी लोकांना त्याबद्दल माहिती असंण गरजेचं आहे. मग तिथे उभा राहिला ‘मार्केटिंग’चा प्रश्न? कंपनीचं काम तर दणक्यात सुरू होतं, पण गरज होती ती कंपनी ला घरघरात पोहोचवेल अशा एका मॅस्कॉटची. हा मॅस्कॉट म्हणजे तुमच्या कंपनीची छोटी प्रतिकृती म्हणून नेहमी लोकांच्या डोक्यात घर करून असतो हे लॉजिक चारही मित्रांना पटलेलं होतं. पण या प्रश्नाच उत्तर शोधून काढल्याशिवाय ते शांत बसणाऱ्यातले नव्हते. मग १९५४ मध्ये लोकप्रिय कार्टूनिस्ट आर. के. लक्ष्मण यांच्याकडून एशियन पेंट्स ने एक कार्टून तयार करून घेतलं. हे एका छोट्या मुलाचं कार्टून होतं जो की एक ब्रश हातात घेऊन उभा असतो आणि त्याचे केस त्याच्या डोळ्यापर्यंत आलेले असतात.

पण या पेंट मधील मुलाचं नाव काय ठेवायचं हा प्रश्न होता. कारण आपला पेंट त्यांना घराघरात पोहचवायचा होता. त्यासाठी सर्वांना आपलस वाटेल असं त्या नाव त्या ‘एशियन पेंट्स’च्या जाहिरातीतील मुलाला नाव देणं आवश्यक होत. मग त्याच नाव ठरवण्यासाठी एका पब्लिक पोल असलेल्या स्पर्धेचं आयोजन केलं. त्यावेळी सोशल मीडिया नसल्याने लोकांना त्यांच्या मनातील नाव पोस्ट कार्ड ने पाठवण्याचं आवाहन कंपनीने केलं. विजयी नाव देणाऱ्या व्यक्तीला ‘५०० रुपये’ बक्षीस दिलं जाईल असंही त्यात नमूद होतं. लोकांना ही कल्पना प्रचंड आवडली आणि त्यांनी उदंड प्रतिसाद दिला.

त्याकाळी एशियन पेंट्स ला ४७००० लोकांनी पत्र पाठवून त्या कार्टून मधील मुलासाठी नाव सुचवलं. ‘गट्टू’ हे नाव फायनल करण्यात आलं आणि दोन विजेत्यांना बक्षीस सुद्धा देण्यात आलं. मॅस्कॉट नंतर गरज होती ती टॅगलाईन ची. Distemper या ब्रँड सोबत एशियन पेंट्स ने गट्टू हे मॅस्कॉट आणि ही टॅगलाईन जोडली : “Don’t lose your Temper, use Tractor Distemper”. आणि लोकांना ही टॅगलाईन सुद्धा खूप आवडली आणि मार्केट मधील पेंट ची डिमांड वाढायला लागली. लवकर सप्लाय करता यावं म्हणून कंपनीने भांडुप इथे स्वतःचा पहिला प्लांट सुरू केला. आणि काही दिवसातच त्यांनी निर्यात करायला सुद्धा सुरुवात केली आणि १९५७ ते १९६७ या काळात कंपनी ने कित्येक विदेशी कंपन्यांसोबत सुद्धा काम केलं. तो पर्यंत भारत स्वातंत्र्य झाला होता. निर्बंध संपले होते. १९६७ मध्ये एशियन पेंट्स ने फिजी या देशात पहिला विदेशी प्लांट सुरू केला आणि ते म्हणतात तसं, “… & they never look back”

आज एशियन पेंट्सकडे हजारो कलर्स, थीम, टेक्स्चर शेड्स आहेत आणि जगभरात त्यांचं कौतुक होत आहे. सामान्य माणूस ते अगदी उच्चभ्रू लोक या दोन्ही श्रेणींना कंपनी ने एकाच वेळी टार्गेट करून मार्केट मध्ये आपलं स्थान पक्कं केलं. घराच्या आतील पेंट सोबतच बाहेरील (exterior) या श्रेणीत सुद्धा एशियन पेंट्स ला पसंती मिळू लागली. काही दिवसातच एशियन पेंट्सने भिंतींसोबतच लाकडाला देण्याचे पेंट्स सुद्धा तयार करायला सुरुवात केली. त्यासोबतच इतर बिजनेस जसं की, बाथरूम फिटिंग आणि किचन फिटिंग मध्ये सुद्धा आपलं स्थान निर्माण केलं आहे.

एशियन पेंट कमी कालावधी खूपच लवकर प्रकाशझोतात आला. पण त्यामागे या सर्वांची प्रचंड मेहनत, इच्छाशक्ती होती. एवढंच नाही तर एशियन पेंट्स चं यशस्वी होण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ते वेळेसोबत स्वतःला सतत बदलत राहिले. आपल्या दर्जेदार प्रॉडक्ट सोबतच कंपनीने मार्केट ट्रेंड्स चा सतत अभ्यास केला आणि त्यानुसार एशियन पेंट्स ने आपली वेबसाईट, सोशल मीडिया याकडे लक्ष दिलं. सोशल मीडिया वर सुद्धा कंपनी नेहमीच काही तरी कॅम्पेन घेऊन लोकांचा फीडबॅक घेण्याचा आणि त्यांची मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. पुढे या पेंटनं वेगवेगळ्या माध्यमातून मार्केटिंग करायला सुरुवात केली. आणि लोकांना हे पूर्णपणे पटवून देण्याचा प्रयत्न केला कि, एशियन पेंट्स म्हणजे ‘सुरक्षित पेंट्स’ आहे. आणि लोकांच्या मनात तशी भावना सुद्धा निर्माण केली होती.

एशियन नंतर जी सुसाट सुटली ती आजवर कधी थांबली सुद्धा नाही..२००४ मध्ये एशियन पेंट्स ला Forbes या मासिकाने Best Under A Billion Companies या यादी मध्ये समाविष्ट करून घेतलं आहे. त्यासोबतच, British Safety Council ने एशियन पेंट्स ला ‘Sword of Honour’ हा किताब दिला आहे. एशियन पेंट्स त्या निवडक कंपनी पैकी आहे, ज्या की भारत पारतंत्र्यात असताना अस्तित्वात आल्या आणि आजही आपलं स्थान आणि ५३% मार्केट शेअर टिकवून आहेत.शिवाय, एशियन पेंट्स ही आशिया खंडातली पेंट बनवणारी तिसऱ्या क्रमांकावरची कंपनी आहे, ज्यांचे १६ देशांमध्ये प्लांट आहेत. ७८ वर्षांपूर्वी सुरू झालेली ही पेंट कंपनी आज ही सर्वाधिक मागणी असलेली कंपनी आहे. बसल्या बसल्या आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव करून घेत, आपल्या देशाला आत्मनिर्भर बनवण्याच्या हेतूने या चौकडीने एक निर्णय घेतला आणि तो यशस्वी सुद्धा झाला…यांनी इतकं मोठं यश मिळवलं कि, आपल्या बुसीन्सचंच नाही तर भारताचं नाव देखील जगभरात गाजवलं… जी प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या चौघांसाठी हेच म्हणायला लागेल कि, ‘फक्त चर्चा करण्यासाठी एकत्र आलेल्यांची चर्चा आज अक्ख जग करतय’