शहीद जवानांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आम्हाला विश्वचषक जिंकायचाय- विराट कोहली

0
287

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – शहीद जवानांच्या हौतात्म्याची तुलना कशाचीही होऊ शकत नाही. त्यांनी देशासाठी दिलेले बलिदान हे अत्यंत मोलाचे आहे. त्या शहीद जवानांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आम्हाला विश्वचषक जिंकायचाय, असे विधान टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने केले. यंदाची विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडिया मंगळवारी रात्री इंग्लंडला रवाना झाली. त्या आधी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता.

“तुम्हाला अनेक गोष्टींपासून प्रेरणा मिळते. जवानांपासून मिळणारी प्रेरणा ही सर्वात महत्वाची असते. जवान सीमेवर देशाचे रक्षण करतात. त्यामळे त्यांच्यापेक्षा मोठे प्रेरणास्थान इतर कोणते असूच शकत नाही . जेव्हा भारतीय जवानांचा विषय निघतो किंवा देशासाठी त्यांची भूमिका याबाबत चर्चा घडते, तेव्हा त्यांच्या कर्तव्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही”, असेही तो म्हणाला.

वर्ल्ड कप २०१९ हा सगळ्यात कठीण आणि आव्हानात्मक विश्वचषक असेल. कारण हा एकदिवसीय विश्वचषक आहे. आतापर्यंत मी जे एकदिवसीय विश्वचषक खेळलो आहे, त्यात मी खेळाडू म्हणून खेळलो होतो. पण आता मात्र मी कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे हा विश्वचषक नक्कीच आव्हानात्मक असणार आहे, असे वक्तव्यही त्याने यावेळी केले.