Maharashtra

शहिदांच्या नावे मतं मागणं म्हणजे टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार – शरद पवार

By PCB Author

April 17, 2019

बारामती, दि. १७ (पीसीबी) – शहीद जवानांच्या नावे मतं मागणं, नवमतदारांना तसं आवाहन करणं म्हणजे टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना आत्ताच राष्ट्रवाद का आठवला? असाही प्रश्न शरद पवार यांनी विचारला. दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे अशीही टीका पवार यांनी केली. तसेच नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्या संबंधांबाबत शंका वाटते असंही पवार यांनी म्हटलं आहे.

बारामतीचं महत्त्व आता विरोधकांना कळलं असून मतदार त्यांना धडा शिकवतील असंही वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत सगळेच जण महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत. विकासाच्या घोषणा दिल्या, जनतेला स्वप्नं दाखवली पण एकही आश्वासन पंतप्रधानांनी पाळलं नाही अशीही टीका पवार यांनी केली.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात जुंपली आहे. एकीकडे पवार कुटुंबीयांवर आणि शरद पवारांवर नरेंद्र मोदी निशाणा साधत आहेत. तर त्याच टीकेला शरद पवार चोख उत्तर देत आहेत. आज शरद पवार यांनी पुलवामा शहिदांच्या नावे मतं मागणाऱ्या मोदींवर निशाणा साधला आहे.