शहर परिसरात चोरीच्या घटनात वाढ; तब्बल ‘एवढ्या’ लाखांचा मुद्देमाल चोरीला

0
481

पिंपरी, दि.०१ (पीसीबी) : चिंचवड शहर परिसरात जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी अशा चोरीच्या वेगवेगळ्या 10 घटना उघडकीस आल्या आहेत. या 10 घटनांमध्ये 10 लाख 46 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी निगडी, आळंदी, चिखली, तळेगाव दाभाडे, एमआयडीसी भोसरी, पिंपरी, हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातून वाहने चोरीस जाण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मंगळवारी (दि. 30) देखील शहरातून चार दुचाकी चोरीस गेल्या आहेत. दुचाकी चोरीच्या पहिल्या गुन्ह्यात राहूल हनुमंत येवले (वय 28, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमवारी (दि. 29) रात्री साडेआठ ते पावणे अकरा वाजताच्या दरम्यान फिर्यादी यांची 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी ट्रान्सपोर्ट नगर, निगडी येथून चोरून नेली.

दुचाकी चोरीच्या दुसऱ्या गुन्ह्यात संजय तुकाराम यादव (वय 40, रा. गवळीमाथा, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यादव यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी सोमवारी रात्री साडेनऊ ते मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान राहत्या घराजवळून चोरून नेली.

वाहन चोरीच्या तिसऱ्या गुन्ह्यात पवन अनिल परदेशी (वय 45, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी परदेशी यांची 30 हजार रुपये किमतीची दुचाकी 24 नाव्हेंबर रोजी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास राहत्या घराजवळून चोरून नेली.

वाहन चोरीच्या चौथ्या गुन्ह्यात प्रितेश जगदीश इंदानी (वय 29, रा. सूसगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी इंदानी यांची 30 हजार रुपये किमतीची दुचाकी सोमवारी रात्री बारा ते मंगळवारी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान निया अपार्टमेंट या इमारतीच्या पार्किंगमधून चोरून नेली.

तळवडे येथे खिडकीचे ग्रील उचकटून चोरट्याने एक लाख 44 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 29) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. नवीन ज्ञानेश्‍वर भालेकर (वय 43, रा. टॉवर लाइन रोड, तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सोमाटणे फाटा येथे महिला दूध आणण्यासाठी बाहेर गेली. दूध घेऊन घरी येईपर्यंत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 16 हजार 200 रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 29) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी समीर भगवान जगदाळे (वय 33, रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रस्त्याने पायी चालत जात असलेल्या वृद्धाच्या तोंडावर मिरची पावडर टाकून लुटले. ही घटना सोमवारी (दि. 29) सायंकाळी आकुर्डी-निगडी येथे घडली. कवडू विठोबा थूल (वय 68, रा. धृवदर्शन हाऊसिंग सोसायटी, प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या घाटावर हा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी निघालेल्या एका वृद्ध नागरिकाला दोन चोरट्यांनी धक्का देऊन खाली पाडले आणि गळ्यातील दोन लाख 40 हजार रुपये किमतीची सोनसाखळी पळवली. तसेच एका महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपयांची बोरमाळ त्याच चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार मंगळवारी (दि. 30) सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडला. दत्तात्रय सिताराम खोकराळे (वय 61, रा. खामुंडी सोमनाथ नगर, ता. जुन्नर) यांनी या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

निगडी बस स्टॉपवर लोणावळा येथे जाणाऱ्या बसमध्ये चढण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका महिलेचा बॅग मधून तीन लाख 20 हजार रुपयांचे सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 30) सकाळी घडली. याप्रकरणी 55 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बावधन खुर्द येथील द शॅक हॉटेल मध्ये चोरी करताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. अभिजित साधू ठोंबरे (वय 20, रा. तळजाई पद्मावती, पुणे), जयमलसिंग भगवानसिंग सौंते (वय 40, रा. चांदणी चौक, बावधन) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अभिजित राजेंद्र दगडे (वय 30, रा. बावधन बुद्रुक) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हॉटेलमधून तीन व्यावसायिक फ्रीज, लोखंडी टेबल, भांडी, गॅस सिलेंडर, गॅस शेगडी असे एक लाख 51 हजारांचे साहित्य चोरून नेत होते.