शहर परिसरातून कार, दुचाकीसह दीड लाखाचा ऐवज चोरीला..

0
325

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी एक कार, दोन दुचाकी, रोख रक्कम, वायर, रिक्षाचे चाक आणि सीट असा एकूण एक लाख 59 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी सांगवी, तळेगाव दाभाडे, चाकण, दिघी, पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सांगवी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. पिंपळे सौदागर येथील बेस्ट नावाचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी 23 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. हा प्रकार सोमवारी (दि. 6) सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी बालाजी अरुण लाकाळ पाटील (वय 33, रा. दिघी) यांनी फिर्याद दिली आहे.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्यातील पहिल्या गुन्ह्यात निळकंठ जगन्नाथ काळे (वय 68, रा. कोंढवा, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. सोमाटणे मधील नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को ऑप लिमिटेड येथे क्रेनला बसवलेली 15 हजार रुपये किमतीची 150 मीटर लांबीची केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार रविवारी (दि. 5) रात्री आठ ते दहा वाजताच्या कालावधीत घडला.
श्रीनाथ बाळकृष्ण कुलकर्णी (वय 42, रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांची 60 हजार रुपये किमतीची कार त्यांच्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 6) सकाळी उघडकीस आला आहे.
चाकण पोलीस ठाण्यात आलोक भारती मिश्रा (वय 31, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांची 40 हजार रुपये किमतीची दुचाकी त्यांच्या भाड्याच्या खोलीच्या पार्किंगमधून चोरून नेली. हा प्रकार शनिवारी (दि. 4) सकाळी उघडकीस आला आहे.
दिघी पोलीस ठाण्यात चैतन्य एकनाथ पानसरे (वय 22, रा. सुसगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देहूफाटा येथे बन्सीलाल टेक्स्टाईलच्या समोर पार्क केलेली 15 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार 30 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी पावणे दोन वाजताच्या कालावधीत घडला.

पिंपरी पोलीस ठाण्यात अर्जुन निवृत्ती धुमाळ (वय 59, रा. काळभोरनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी हे रिक्षा चालक आहेत. त्यांनी शनिवारी रात्री त्यांची रिक्षा त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी रिक्षाचे चाक आणि सीट असा एकूण सहा हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला.