शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ; चोरट्यांनी फॉर्च्युनर, इनोव्हासह डंपर ही पळवला

0
825

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होता आहे. यामुळे शहरात गाडी चोरट्यांची टोळी सक्रीय झाल्याचे समजते. चोरट्यांनी फॉर्च्युनर, इनोव्हा यांसारख्या महागड्या कारसह डंपर चोरल्याचे समोर आली आहे. ही टोळी रस्त्याच्या बाजूला, घरासमोर, पार्कींगमध्ये लावलेली वाहने चोरते.

निगडी पोलीस ठाण्यात नेल्वीन पारमट्टम वर्गीस (वय ४४, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी त्यांची फॉर्च्युनर कार चोरीला गेल्याची फिर्याद दिली आहे. सोमवारी (दि. ८) रात्री त्यानी त्यांची फॉर्च्युनर (एमएच/१४/डीएफ/५८१०) सेक्टर नंबर २६ येथे रस्त्यावर पार्क केली होती. चोरट्याने १२ लाख रुपये किमतीची ही मोटार चोरून नेली. चिकन चौक ते त्रिवेणी नगर चौक दरम्यान सेवा रस्त्यालगत पार्क केलेला सहा लाख रुपये किमतीचा डंपर (एमएच/१२/ईएफ/५४५७) चोरट्यांनी लांबवला. ही घटना बुधवारी (दि. १०) सकाळी उघडकीस आली. नारायण गुणाजी तांबवे (वय ५५, रा. ओटास्किम, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तर शरद यांची इनोव्हा कार (एमएच/१२/एचझेड/७८९१) शनिवारी (दि. ६) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बिघडली. त्यामुळे त्यांनी पुणे-नाशिक महामार्गावर हॉटेल महादेव समोर रस्त्याच्या बाजूला ती पार्क केली. रात्री चोरट्यांनी ही तीन लाख रुपये किमतीची कार चोरून नेली. रविवारी (दि.७) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात शरद सीताराम बर्वे (वय ३३, रा. चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. या वाढत चाललेल्या वाहन चोरीवर पोलिस कसे अंकुश लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.