शहरात रस्त्यांचे जाळे निर्माण करून परिपूर्ण विकास करणार – आमदार लक्ष्मण जगताप

0
662

रस्ते या शहराच्या रक्तवाहिन्या असतात. वाहतूक व्यवस्था सुरळित असलेल्या शहरांची प्रगती झपाट्याने होते. त्यामुळे शहरात रस्त्यांचे जाळे निर्माण करून परिपूर्ण विकास करण्यावर भर देणार असल्याचे प्रतिपादन भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बिजलीनगर येथे उभारण्यात येणाऱ्या भुयारी मार्गासह विविध रस्ते विकासकामांचे भूमीपूजन आमदार जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, नगरसेवक नामदेव ढाके, राजेंद्र गावडे, बाळासाहेब ओव्हाळ, सुरेश भोईर, नगरसेविका माधुरी कुलकर्णी, करूणा चिंचवडे, भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले, “शहरातील विविध विकासकामांना आता वेग देण्यात येणार आहे. विशेषतः रस्ते उभारणीवर अधिक भर दिला जाईल. रस्ते झाले, तरच शहराचा विकास होईल. मोठ्या रस्त्यांवर येणारा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पर्यायी रस्ते निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहराचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होईल. तसेच नागरिकांचा मार्गही सुकर होईल.”

यावेळी आमदार जगताप यांच्या हस्ते केशवनगर-काळेवाडी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा दुसरा टप्पा, चिंचवड-काळेवाडी पुलापासून भाटनगर मलनिस्सारण प्रकल्पापर्यंत प्रस्तावित १८ मीटर विकास आराखड्यातील रस्ते कामाचे भूमीपूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे चिंचवडगाव येथील लॉन टेनिस क्रीडांगणाचेही त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार जगताप यांनी मैदानावर लॉन टेनिस खेळण्याचा आनंद घेतला.

यावेळी महापौर नितीन काळजे, नगरसेवक नामदेव ढाके व राजेंद्र गावडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.