शहरात आणखी तीन मोबईल हिसकावण्याच्या घटना

0
574

चिंचवड, दि. २८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात चिखली, एमआयडीसी भोसरी परिसरातील शाहूनगर आणि महात्मा फुले नगर येथे दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी पादचारी नागरिकांचे मोबईल फोन हिसकावून नेल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. याबाबत रविवारी (दि. 27) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गणेश अशोक धायरकर (वय 38, रा. वडाचा मळा, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी काळ्या रंगाच्या पल्सरवरील दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी धायरकर 26 जुलै रोजी रात्री सव्वानऊ वाजता देहू-चिखली रोडवर अभंग विश्व सोसायटीसमोर फोनवर बोलत थांबले होते. त्यावेळी काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून दोन चोरटे आले. त्यांनी धायरकर यांच्या हातातून त्यांचा 15 हजाराचा मोबईल फोन जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेला. लॉकडाऊनमुळे याबाबत उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

सारंग विनोदभाई गज्जर (वय 27, रा. शिवतेजनगर, चिंचवड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी गज्जर 27 जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता शाहूनगर, चिंचवड येथील एचडीएफसी कॉलनी रोडने पायी चालत जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांचा 10 हजारांचा मोबईल फोन चोरून नेला.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात आणखी एक जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मकरंद रामधारी यादव (वय 23, रा. महात्मा फुले नगर, भोसरी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पल्सर दुचाकीवरून दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यादव 31 ऑगस्ट रोजी सकाळी पावणेसात वाजता महात्मा फुलेनगर येथील पवना इंडस्ट्रीज कंपनीसमोरून पायी चालत जात होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांचा सहा हजारांचा मोबईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. वरील दोन्ही प्रकारात फिर्यादी कामात व्यस्त असल्याने गुन्हे उशिरा नोंदवण्यात आले आहेत. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.