Pimpri

शहरात अपघातांचं सत्र सुरूच; तीन वेगवेगळ्या अपघातात एकाचा मृत्यू, दोघे जखमी

By PCB Author

November 08, 2021

पिंपरी, दि.०८ (पीसीबी) : सांगवी, चिखली आणि हिंजवडी परिसरात तीन वेगवेगळे अपघात झाले. यात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी रविवारी (दि. 7) सांगवी, चिखली आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शरद पंडित कांबळे (वय 40, रा. दत्तनगर कॉलनी, रहाटणी फाटा, काळेवाडी), असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलीस हवालदार सतीश मापारी यांनी या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद कांबळे हे शुक्रवारी (दि. 5) पुणे येथून वाकडकडे जात असताना औंध हॉस्पिटल जवळ पोस्ट ऑफिस समोर त्यांची दुचाकी घसरून ते खाली पडले. यात गंभीर जखमी झाल्याने शरद कांबळे यांचा मृत्यू झाला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

बापू नाना तापकिरे (वय 50, रा. मिलिंदनगर, ओटास्कीम, निगडी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षाचालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे त्यांच्या पत्नीसह आरोपीच्या रिक्षाने पाटीलनगर, चिखली येथे मुलीला भेटण्यासाठी जात होते. त्यावेळी आरोपीने वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून पुढे असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात रिक्षातील फिर्यादी जखमी झाले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

नेरे येथे शनिवारी (दि. 6) दुपारी सव्वाचारच्या सुमारास अपघात झाला. याप्रकरणी जखमी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष बबन वाघोले (वय 31, रा. दारुंब्रे) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीने त्याच्याकडील चारचाकी वाहन बेदरकारपणे चालवून फिर्यादीला दुखापत केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.