Pimpri

शहरातील स्वच्छ हवेत होणार सुधारणा, वित्त आयोगाकडून पालिकेला 17 कोटी

By PCB Author

February 21, 2023

पिंपरी, दि. 21 (पीसीबी) – हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारच्या 15 व्या वित्त आयोगामार्फत पिंपरी – चिंचवड महापालिकेला 17 कोटी 48 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. तर, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाला 70 लाख आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाला 74 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाकडून राष्ट्रीय स्वच्छ हवा अभियान राबविले जाते. यात दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात हवेची गुणवत्ता सुधारणा करण्यासाठी निधी दिला जातो. यंदाच्या अभियानात राज्यातील पिंपरी – चिंचवडसह 12 महापालिकांना निधी मिळाला आहे. यामध्ये पिंपरी – चिंचवडसह बृहन्मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण – डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर, पुणे, नाशिक, संभाजीनगर, नागपूर, वसई – विरार या महापालिकांचा समावेश आहे. तर, अंबरनाथ व बदलापूर या दोन नगरपालिका भगूर व वाडी या दोन नगरपरिषद. पुणे, देहूरोड, खडकी, देवळाली व संभाजीगनर या कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिकेला 17 कोटी 47 लाख 83 हजार 152 रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. पंधराव्या वित्त आयोगाकडून प्राप्त झालेल्या निधीच्या माध्यमातून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठीच निधी खर्च केला जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने कृती आराखडा निश्चित केला आहे. वाहतूक बेटांवर प्रदूषण मापक यंत्र बसविणे, इंधनामधील भेसळ तपासणीदेखील केली जाणार आहे. यासाठी संबंधित विभागाकडे निधी वर्ग करावा लागणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, महाजनको, अन्न व औषध प्रशासन, वाहतूक पोलिस, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक विकास महामंडळ या शासकीय कार्यालयांच्या अधिकार क्षेत्रानुसार कृती आराखडा अमलात आणण्याच्या सूचना आहेत.

कृती आराखड्यानुसार या उपाययोजना प्रदूषणकारी वाहनांवर कारवाई करणे औष्णिक विद्युत केंद्रातून बाहेर पडणार्‍या राखेवर नियंत्रण ठेवणे नवीन बांधकामांना ग्रीन नेट लावणे जुन्या डिझेल वाहनांवर बंदी घालणे नो पार्किंग मधील वाहनांवर कारवाई करणे रस्त्यावरील अतिक्रमणे हटविणे इंधनातील भेसळ रोखणे इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर वाढविणे अवजड वाहनांची वाहतूक बाह्य मार्गाने वळविणेसेन्सर द्वारे सल्फर डाय ऑक्साईडची तपासणी करणेएकीकृत सिग्नल यंत्रणा उभारणे दुभाजकांमध्ये झाडे लावणे व कारंजे उभारणे.