शहरातील स्वच्छतागृहांच्या दुरावस्थेला जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करा; महापौरांचे आदेश  

0
509

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात भारत स्वच्छ अभियानार्तंगत बांधण्यात आलेली    स्वच्छतागृहे अस्वच्छ असून त्यांची दुरावस्था झाली आहे. तसेच प्रभागात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. याला जबाबदार असणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करा, असे आदेश महापौर राहुल जाधव यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले.

पिंपरी –चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा आज (गुरूवार) झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते.

या सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी भारत स्वच्छ अभियानार्तंगत शहरात बांधण्यात आलेल्या स्वच्छता गृहांची दुरावस्था आणि अस्वच्छतेचा मुद्दा उपस्थित करून महापालिका प्रशासनाला धारेवर घरले. यावरील चर्चेत नगरसेवक सचिन चिखले, राहुल कलाटे, सुजाता पलांडे, आशा धायगुडे-शेंडगे, मंगला कदम, तुषार कामठे, सचिन चिंचवडे, दत्ता साने, तुषार हिंगे, एकनाथ पवार यांनी सहभाग घेतला.     यावर उत्तर देताना महापौरांनी याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देऊन महापालिका आयुक्तांना कारवाई करण्याचे आदेश दिले.

शहरातील सर्रास स्वच्छतागृहे अस्वच्छ आहेत. उद्याने, महापालिकेच्या इमारती, रूग्णालये येथील स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था झाली आहे. दरवाजे, पाण्याचे नळ, खिडक्या मोडकळीस आल्या आहेत. दुर्गंधीमुळे नागरिक स्वच्छतागृहांचा वापर करण्यास टाळटाळ करू लागले आहेत. यामुळे हागणदारीमुक्त शहर घोषणेपुरतेचे राहिले आहे, असे नगरसेवकांनी सांगितले.

यावर उत्तर देताना महापौर जाधव यांनी  अस्वच्छ स्वच्छतागृहांचे आणि प्रभागातील कचऱ्याच्या ढिगांचे फोटो काढून पाठविण्यास सांगून संबंधित विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले. तसेच याबाबत कारणीभूत असणाऱ्या संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या सुचना दिल्या. स्वच्छतागृहे स्वच्छ आणि सुस्थितीत राहण्याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या.