शहरातील भटक्या गोवंशांची कायमस्वरूपी व्यवस्था करा; विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाची मागणी

0
488

पिंपरी दि. २८ (पीसीबी) –   पिंपरी- चिंचवड शहर (जिल्हा) तील रस्त्यावरील मोकाट भटकणाऱ्या गोवंशामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.  शिवाय  या गोवंशांची कासायांकडून कत्तलीसाठी चोऱ्या होत आहेत. तरी या गोवंशांची  कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी  विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्यावतीने करण्यात आली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त  श्रावण हर्डीकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गोवंश  रहदारी ठिकाणी भर रस्त्यामध्ये व चौकात थांबत असल्याने वाहतुकीला अडचण होऊन नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. तसेच  नागरिक व गोवंशही जखमी होत आहेत.  तसेच  नागरिक या गोवंशाना भररस्त्यात खाद्यपदार्थ खायला घालत असतात त्यामुळे शहरातील रस्त्यावर खाद्यपदार्थाचे रूपांतर कचऱ्यात होऊन “स्वछ भारत”  या अभियानाची ऐशीतैशी होत आहे.

शिवाय या गोवंशांची कासायांकडून कत्तलीसाठी चोऱ्या होत आहेत या बाबत पोलीस ठाण्यात  एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गोवंशांच्या चोरीप्रकरणी  विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्यावतीने   कोणतेही अनुचित प्रकार घडू नये व असे अनुचित प्रकार घडल्यास त्यास पूर्णतः महापालिका प्रशासन जबाबदार असेल. त्यामुळे  भटक्या  गोवंशांची योग्य ती काळजी घेवून  लवकरात लवकर त्यांची व्यवस्था करण्यात यावी,  अन्यथा तीव्र आंदोलन  केले जाईल, असा  इशारा या निवेदनात  देण्यात आला आहे.

यावेळी विहिंपचे जिल्हा अध्यक्ष शरदराव इनामदार,  सोलापूर विभाग संयोजक  संदेश भेगडे, सोलापूर विभाग सह संयोजक कुणाल साठे, जिल्हा मंत्री नितीन वाटकर, जिल्हा सहमंत्री धनंजय गावडे, जिल्हा सहमंत्री संजय शेळके, बजरंग दल जिल्हा संयोजक नाना सावंत, प्रसिद्धी प्रमुख मुकुंद चव्हाण,  संदीप वाघेरे, जिल्हा सह संयोजक अभिजित शिंदे,  ग्रामीण जिल्हा संयोजक अमित भेगडे,  गोरक्षा प्रमुख गौरव पाटील, गौरव कुदळे, दादा अच्छरा, निलेश देशमुख, बाबा लांडगे, निलेश चासकर, अनिकेत सस्ते, मंगेश गराडे, मोहित बुलानी  आदी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल गोरक्षक व कार्यकर्ते उपस्थित होते.