शहरातील पुरग्रस्त भागात सोयीसुविधा तात्काळ पुरवा – नाना काटे

0
468

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये  ज्या – ज्या ठिकाणी नागरीवस्ती मध्ये पुराचे पाणी आले आहे. तेथील ड्रनेज लाईनचे चोक अप काढण्यात यावेत,  रस्त्यावरील रोडा रोडा,  गाळ त्वरीत उचलण्यात यावा.  डासांचा फैलाव होऊ नये, म्हणून धुरीकरण करण्यात यावे. तसेच वैद्यकीय सुविधा देण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात वैद्यकीय कक्ष चालू करण्यात यावेत, अशी मागणी विरोधी पक्ष नेते नाना काटे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन तीन दिवसापासून शहरात पुराने थैमान घातले आहे. पवना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू आहे. त्यामुळे  पिंपरी चिंचवड शहरातील नदीकाठच्या नागरीवस्तीमध्ये पुराचे पाणी जाऊन नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

या स्थंलातरीत केलेल्या नागरिकांचे सध्या महापालिकेच्या शाळांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. आता पुर ओसरला आहे, त्यामुळे नागरिक  स्वत:च्या घरात जाऊ लागले आहेत. परंतु पुराच्या पाण्याबरोबर आलेला राडा रोडा, गाळ नागरिकांच्या घरात, रस्त्यावर साचून राहिलेला आहे. तसेच पुराच्या पाण्यामुळे ड्रेनेज लाईन चोक अप झालेल्या आहेत. त्यामुळे या परिसरामध्ये साथीचे रोग फैलावण्याची भीती आहे, त्यामुळे आवश्यक त्या सोयीसुविधा तात्काळ पुरविण्यात याव्यात, असे या निवेदनात म्हटले आहे.