शहराचा पाणीपुरवठा शनिवारपर्यंत सुरळीत करा; आयुक्तांचा पाणीपुरवठा विभागाला अल्टीमेटम

0
692

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांच्या संतप्त भावना आणि तक्रारींची गंभीर दखल घेत महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शनिवारपर्यंत (दि. २४) पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाला दिले. तसेच महापालिकेच्या स्थापत्य आणि बांधकाम विभागातील अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी यांनी पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत पाणीपुरवठा विभागात काम करण्याचे आदेशही दिले.

महापालिकेची सर्वसाधारण सभा आज (बुधवार) झाली . सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. या सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी शहरातील पाणी प्रश्नांवरून प्रशासनाला धारेवर धरले. शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण १०० टक्के भरले असताना शहरात पाणीटंचाई का? असा संतप्त सवाल सर्वपक्षीय नगरसेवकांनी आणि गटनेत्यांनी करून याबाबत आयुक्तांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी केली.

यावर उत्तर देताना आयुक्त हर्डीकर म्हणाले की, शहरातील पाणी प्रश्नांसाठी प्रशासन काहीअंशी दोषी आहे. यात पाणीपुरवठा विभागाचीही चूक आहे. पाणी प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी महापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, गटनेते, नगरसेवक यांची पाणीपुरवठा जलनिस्सारण समिती गठीत करण्यात येईल. पाणीपुरवठा विभागाने शनिवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करावा. त्यानंतर सोमवारी (दि.२६) समितीची बैठक घेण्यात येईल.

पाणी पुरवठ्याबाबत काही तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. अनधिकृत नळजोड करणाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच अतिरिक्त पाणी वापरावर नियंत्रण आणावे, विभागनिहाय पाण्याचा दाब निश्चित करावा. पाण्याबाबत तक्रारींचे स्वरूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे आहे. यासाठी व्हॉल्वमन, ऑपरेटर यांना जबाबदार धरावे, अशा सुचना आयुक्तांनी दिल्या. नागरिकांना सकाळी किंवा संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत पाणी देणे शक्य होणार नाही. पाण्याचे वेळापत्रक बदलावे लागणार आहे. याची तयारी नागरिकांनी ठेवावी.

शहरात झोपडपट्ट्यांमध्ये वाढ झाली आहे. वाढती लोकसंख्या आणि अनधिकृत नळजोड, गळती या कारणास्तव उपलब्ध पाण्याचे समन्यायी वितरण करणे अवघड आहे. तरी याबाबत काही सुचना, हरकती, चर्चा करण्यासाठी प्रशासन तयार आहे, असेही आयुक्तांनी सांगितले. स्लम, आरोग्य, पर्यावरण आदी विभाग वगळता स्थापत्य आणि बांधकाम विभागातील अभियंते, अधिकारी, कर्मचारी यांनी पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत पाणीपुरवठा विभागात काम करण्याचे निर्देशही आयुक्तांनी यावेळी दिले.