Banner News

शहरातील अनाधिकृत बांधकामांना शास्तीकर वगळून मूळ कर आकारणी करा – महापौर उषा ढोरे

By PCB Author

January 12, 2022

पिंपरी दि. 12 (पीसीबी) –  पिंपरी-चिंचवड शहरातील अनाधिकृत बांधकामांना शास्तीकर वगळून करआकारणी करावी, अशी मागणी महापौर उषा ढोरे यांनी केली. तर, महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना अनाधिकृत बांधकामावर शास्तीकराचे ओझे सन 2008  मध्ये लादले गेले. आता  गुंठेवारी कायद्यानुसार बांधकाम नियमित करण्यासाठी पालकमंत्री शास्तीकर वगळून मिळकत कर भरणा करुन घेण्याबाबत महापालिका आयुक्त यांना आदेश देत आहेत हे म्हणजे शास्तीकर माफीबाबत जनतेच्या तोंडाला पुन्हा पाने पुसण्याचाच प्रकार आहे असा आरोप सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केला.

मुळात स्थायी समितीने याबाबत ठराव केलेला असताना फक्त श्रेयासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांचा केविलवाणा प्रकार यातून दिसून येतो. याउलट राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पालकमंत्र्याकडे सर्व शास्तीकर वगळून मिळकतकर घ्यावा अशा प्रकारचा आदेश द्यावा अशी मागणी करणे अपेक्षित होते, असेही ढाके म्हणाले. महापौर उषा ढोरे म्हणाल्या की, सन 2017 मध्ये भाजपा महापालिकेत सत्तेवर आल्यानंतर दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 1 हजार चौरस फुट अनाधिकृत बांधकामावरील संपूर्ण शास्तीकर माफ केला आहे त्याचप्रमाणे 1001 ते 2000 चौरस फुट अनाधिकृत बांधकामावर 0.5 शास्तीकर केला आहे. तसेच महानगरपालिकेने संपूर्ण शास्तीकर माफ करण्याबाबत महापालिका सभेचा ठराव शासनाकडे पाठविलेला आहे. त्याची अंमलबजावणी न करता शासनाने अनाधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी गुंठेवारीसाठी जाचक अटी नागरिकांच्या माथी मारल्या आहेत. प्रथम नागरिकांना गुंठेवारी सोयीस्कर होण्यासाठी सदर गुंठेवारीचे नियमात शिथिलता आणण्यात यावी.

तसेच नागरिकांनी जशी घरे बांधलेली आहे तशीच बांधलेली घरे गुंठेवारीने नियमित करावीत अशी मागणी केली आहे.  त्याचप्रमाणे शास्तीकर वगळून भरणा घेण्याऐवजी महापालिका सभा ठराव याप्रमाणे सरसकट शास्तीकर माफ करून शहरातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी महापौरांनी शासनाकडे केली आहे.