Pimpri

शहराची लोकसंख्या 25 लाख, रूग्णालयातील खाटांची संख्या 10 हजार 600

By PCB Author

September 05, 2022

पिंपरी दि. ५ (पीसीबी) – औद्योगिकनगरी, स्मार्ट सिटी ते मेट्रो सिटी अशी वाटचाल सुरू असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सद्यस्थितीत 25 लाखांच्या घरात गेली आहे. शहरात महापालिका आणि खासगी रूग्णालयात असे मिळून 10 हजार 582 खाटांची संख्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनानुसार 1 हजार लोकसंख्येमागे 3 खाटा असणे गरजेचे आहे. तर भारतात 1 हजार लोकसंख्येनुसार 2 खाटा असाव्यात हा निकष लागू केला आहे. त्यानुसार लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णालयात पुरेसे बेड असून समाधानकारक स्थिती आहे.

पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात भोसरी, चाकण, रांजणगाव, तळेगाव दाभाडे एमआयडीसी, हिंजवडी, तळवडे आयटी पार्क आहे. यामध्ये लाखो उच्चशिक्षितांपासून अशिक्षितांच्या हाताला रोजगार मिळत आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक शिक्षण, व्यवसाय, नोकरीनिमित्त येत आहेत. त्यामुळे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे मूलभूत सुविधा पुरविताना महापालिका प्रशासनाची दमछाक होत आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांना खाटांसाठी धावाधाव करावी लागली. अनेकांना वेळेवर बेड उपलब्ध झाला नाही. त्यामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनानुसार 1 हजार लोकसंख्येमागे 3 खाटा असणे गरजेचे आहे. तर भारतात 1 हजार लोकसंख्येनुसार 2 खाटा असाव्यात हा निकष लागू केला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेचे सर्वाधिक मोठे असलेल्या वायसीएम रूग्णालयासह आठ रूग्णालये, 28 दवाखाने, झोपडपट्टीत 20 आरोग्य सेवा केंद्र नागरिकांच्या उपचारासाठी उपलब्ध आहेत. यामध्ये महापालिकेचे 1 हजार 589 खाटांची संख्या आहे. महापालिका रूग्णालयात दररोज बाह्य रूग्ण विभागात 2 हजार 354 तर वार्षिक 8 लाख 59 हजार 362 रूग्ण उपचारासाठी येत आहेत. तर आंतर रूग्ण विभागात दररोज सुमारे 101 रूग्ण तर वार्षिक 36 हजार 954 उपचारासाठी येतात.

शहरामध्ये खासगी रूग्णालयांची संख्या मोठी आहे. महापालिकेच्या पर्यावरण अहवालात याची नोंद नाही. मात्र, खासगी रूग्णालयातील खाटांची संख्या आहे. त्यानुसार 8 हजार 993 खाटा खासगी रूग्णालयात आहेत. महापालिका आणि खासगी अशा मिळून शहरात 10 हजार 582 खाटा आहेत. सध्यस्थितीत शहरातील महापालिका आणि खासगी रूग्णालयातील खाटांची संख्या समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे.

रूग्णालयांची नावे खाटांची संख्या वायसीएम रूग्णालय 750 नवीन थेरगाव रूग्णालय 400 नवीन भोसरी रूग्णालय 100 नवीन आकुर्डी रूग्णालय 130 नवीन जिजामाता रूग्णालय 120 सावित्रीबाई फुले रूग्णालय 49 सांगवी रूग्णालय 20 यमुनानगर रूग्णालय 20 खासगी रूग्णालय 8993 एकूण – 10,582