शशी थरुर देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता; त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करु नये- दिल्ली पोलिस

0
423

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी आरोपी करण्यात आलेले  काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या अटकपूर्व जामिनास दिल्ली पोलिसांनी विरोध दर्शवला. शशी थरुर हे देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता असून त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करु नये, असा दिल्ली पोलिसांनी न्यायालयात सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ जुलैला होणार  आहे.

जानेवारी २०१४ मध्ये दिल्लीतील आलिशान हॉटेलमध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणी थरुर यांच्यावर कलम ४९८ अ (पतीकडून महिलेचा क्रूर छळ) आणि कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थरुर यांनी अटकपूर्व जामिनासाठी दिल्ली न्यायालयात अर्ज केला असून या अर्जावर बुधवारी सुनावणी झाली.

दिल्ली पोलिसांच्या वतीने विशेष सरकारी वकील अतूल श्रीवास्तव यांनी बाजू मांडली. शशी थरुर हे प्रभावशाली व्यक्ती असून ते तपासात अडथळे आणू शकतात. ते वारंवार परदेश दौऱ्यांवर जातात आणि ते परदेशात स्थायिक देखील होऊ शकतात. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार नारायण सिंह आणि बजरंगी हे दोन नोकर अजूनही थरुर यांच्या घरीच काम करतात. साक्ष फिरवण्यासाठी थरुर त्यांच्यावरही दबाव टाकू शकतात, असे सरकारी वकिलांनी नमूद केले.